मुंबई (Mumbai) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी बुलेट ट्रेन मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे सारथ्य रेल्वेचे मोटरमन करणार आहेत. बुलेट ट्रेन चालवण्यासाठी 20 चालकांची भरती करण्यासाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) रेल्वेचे मोटरमन, लोको पायलट, मेट्रोच्या चालकांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी 20 जणांची अंतिम निवड केली जाणार असून त्यांना जपानमध्ये बुलेट ट्रेन चालवण्याचे ट्रेनिंग दिले जाणार आहे.
मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम सध्या गुजरातमध्ये प्रगतीपथावर असून 2027 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याचा दावा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर 'एनएचएसआरसीएल' कडून बुलेट ट्रेन ऑपरेटर आणि चालकांच्या नियुक्तीची तयारी सुरू करण्यात आली असून रेल्वेचे मोटरमन, लोको पायलट, मेट्रोच्या चालकांकडून अर्ज मागवले आहेत. त्यानुसार पात्र उमेदवारांना 7 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. दरम्यान, निवड झालेल्या अर्जदारांना जपानमध्ये ट्रेनिंग देण्यात येणार असल्याची माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. याशिवाय रोलिंग स्टॉक, रोलिंग स्टॉक डेपो, डेटाबेस प्रशासन, वित्त आणि आर्किटेक्चर या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने नुकताच बुलेट ट्रेन प्रकल्पातील महत्वाचा टप्पा पूर्ण केला आहे. गुजरातमधील वलसाड येथील बुलेट ट्रेन कॉरिडॉरमध्ये पहिला माउंटन बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्याची एकूण लांबी 350 मीटर तर 12.6 मीटर रुंदी आणि 10.25 मीटर उंची आहे. मुंबई आणि अहमदाबाद शहरांना जोडण्याचे काम हा बोगदा करतो. राज्यातही बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरु आहे. मुंबईतील बीकेसीसह समुद्राखालील ७ किमी लांबीच्या बोगद्यासह २१ किमी लांबीच्या बोगद्याचे कामदेखील सुरू करण्यात येणार आहे. मुंबईतील बीकेसी ते ठाणेदरम्यान 21 किलोमीटरचा भूमिगत मार्ग बांधला जाणार आहे. हा मार्ग समुद्राच्या खालून तयार केला जाणार आहे. 7 किलोमीटरचा मार्ग हा 'अंडर सी टनल'चा म्हणजेच समुद्राखालून जाणाऱ्या बोगद्याचा असेल. बुलेट ट्रेनने मुंबई ते अहमदाबाद प्रवासाचा वेळ 127 मिनिटांत पूर्ण होणार आहे. मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉर प्रकल्पाची अंदाजे किंमत 1.08 लाख कोटी इतकी आहे.