मुंबई (Mumbai) : वांद्रे-वरळी सी-लिंकवरुन ये-जा करणाऱ्या वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून अखेर नवीन कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली. रोडवेज सोल्यूशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी सी लिंकवर टोल वसुली करणार आहे. नव्या कंत्राटदारांनी टोल वसुलीला सुरुवात सुद्धा केली आहे. या संदर्भात फेरटेंडरविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर वांद्रे-वरळी सी लिंक वरील टोल वसुली करण्यासाठी कंत्राटदारांच्या नियुक्त्या करण्याचा मार्ग मोकळा झाला.
वांद्रे-वरळी सी लिंक सेवेत दाखल झाल्यापासून याठिकाणी टोल वसुलीचे टेंडर एमईपी कंपनीला देण्यात आले होते. हे टेंडर तीन वर्षांच्या काळासाठी देण्यात आले. या टेंडरचा कालावधी 30 जानेवारी 2020 रोजी संपला. त्यामुळे एमएसआरडीसीने नव्या कंत्राटदाराची 19 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात यावी यासाठी टेंडर मागविले होते. पण त्याला प्रतिसाद न मिळाल्याने टेंडर रद्द करण्यात आले. त्यानंतर फेरटेंडर मागविण्यात आले. फेरटेंडरमध्ये कंत्राटदाराची तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्याची अट घालण्यात आली होती. याविरोधात एमईपी आणि अन्य एका कंपनीने न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे हे सर्व प्रकरण न्यायालयाच्यात गेले.
यासंदर्भातील याचिका न्यायालयाने मागील आठवड्यात फेटाळून लावल्या. त्यामुळे कंत्राटाला अंतिम रुप देण्याचा मार्ग मोकळा झाला. न्यायालयाने निकाल दिल्यानंतर एमएसआरडीसीने फेरटेंडरची प्रक्रिया पूर्ण करून टोल वसुलीसाठी रोडवेज सोल्यूशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीने वांद्रे-वरळी सी लिंकवर टोल वसुलीचे काम सुरु केले आहे अशी माहिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.