मुंबई (Mumbai) : मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर मुंबई ते सिंधुदुर्ग या कोकण ग्रीन फिल्ड द्रुतगती महामार्गाच्या आखणीस नुकतीच अंतिम मान्यता मिळाली. सुमारे ३८८ किलोमीटरच्या या महामार्गासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) प्रकल्प अंमलबजावणी संस्था म्हणून काम करणार आहे.
मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून कोकण विभाग हा पर्यटन, औद्योगिक व वाणिज्य कामांसाठी समृद्ध आहे. कोकण तसेच गोवा ते कोकणातून मुंबईकडे ये-जा करणाऱ्या पर्यटकांची, व्यावसायिकांची मोठी संख्या आहे. मुंबई ते कोकण पुढे गोवा असा द्रुतगती महामार्ग झाल्यास औद्योगिक पर्यटन क्षेत्र व दैनंदिन दळणवळण गतिमान होऊन कोकणची सर्वांगीण प्रगती होऊ शकेल, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावात म्हटले आहे.
कोकण द्रुतगती महामार्ग झाल्यानंतर मुंबईसाठी सर्वात गतिमान महामार्ग तयार होईल. हा महामार्ग नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाईल. त्यामुळे कोकणातून आंतरराष्ट्रीय प्रवास करणे सोयीचे होईल. कोकण द्रुतगती महामार्ग हा रायगड जिह्यातील पेण, अलिबाग, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा तसेच रत्नागिरी जिह्यातील मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि सिंधुदुर्ग जिह्यातील देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी असा जाणार आहे.
हा महामार्ग पेण जिह्यातल्या बलवली गावातून सुरू होईल. रायगड जिह्यातील पेण ते रत्नागिरी हा महामार्ग 94.40 किलोमीटर, रायगड रत्नागिरी जिल्हा ते गुहागर चिपळूणपर्यंत 69.39 किलोमीटर, पुढे गुहागर, चिपळूण ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा असा 122.81 किलोमीटर आणि सिंधुदुर्ग. जिल्हा ते पत्रादेवी असा 100.84 किलोमीटर असा एकूण 388.45 किलोमीटरचा हा महामार्ग आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची या प्रकल्पासाठी अंमलबजावणी संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.