मुंबई (Mumbai) : कुलाबा ते सिप्झ मेट्रो 3 मार्गिकेसाठी नाकारण्यात आलेल्या कांजूरमार्ग येथील त्या वादग्रस्त जमिनीची मागणी आता स्वामी समर्थनगर (अंधेरी वेस्ट) ते विक्रोळी या मेट्रो 6 मार्गिकेच्या कारशेडच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केली आहे. 'एमएमआरडीए'ने त्याबाबतचे पत्र राज्य सरकारला लिहिले आहे. त्यामुळे कांजूरमार्ग येथील वादग्रस्त जागा पुन्हा चर्चेत आली आहे.
आधीच्या फडणवीस सरकारच्या काळात मेट्रो 6 मार्गिकेचे कारशेड कांजूरमार्ग येथील जागेवर प्रस्तावित करण्यात आले होते. या मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील सुमारे 15 हेक्टर जागा लागणार होती. तर मेट्रो 3 मार्गिकेचे कारशेड आरे कॉलनीत प्रस्तावित होते. मात्र ठाकरे सरकारने सत्तेवर येताच मेट्रो 3 चे कारशेड आरे येथून कांजूरमार्गला स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. तसेच कांजूरमार्गला एकात्मिक कारशेड उभारण्याचे निश्चित केले.
कांजूरमार्ग येथील 102 एकर जागेवर मेट्रो 3, मेट्रो 4 (वडाळा ते कासारवडवली), मेट्रो 6 मार्गिकेचे कारशेड एकत्रित उभारण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो 3 ची कारशेड कांजूरमार्गला हलविण्याला विरोध दर्शविला होता. तसेच खासगी विकासकाने कांजूर येथील प्रस्तावित जागेवर दावा करून न्यायालयात धाव घेतली. न्यायालयीन प्रक्रिया आणि राजकीय वादात कांजूरमार्गची जागा अडकली. दरम्यान, राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार सत्तेवर येताच त्यांनी मेट्रो 3चे कारशेड पुन्हा आरे येथे हलविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कांजूरमार्ग येथील जागा मेट्रो 6 मार्गिकेसाठी मिळण्याची आशा 'एमएमआरडीए'च्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीने 'एमएमआरडीए'ने कांजूरमार्ग येथील जागा मेट्रो 6 मार्गिकेसाठी देण्यात यावी या मागणीचे पत्र राज्य सरकारला पाठवले आहे. मात्र केंद्र सरकारकडून कांजूरमार्ग येथील जागा मेट्रो 6 मार्गिकेसाठी उपलब्ध न झाल्यास हा प्रकल्प रखडण्याची चिन्हे आहेत.