मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) वाहतूक कोडींवर मात करण्यासाठी पॉडटॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल १०१६.३८ कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी काढण्यात आलेल्या टेंडरसाठी साई ग्रीन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद आणि रिफेक्स इंडस्ट्रीज, चेन्नई या बलाढ्य दक्षिणी कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे.
वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते कुर्ला पूर्व रेल्वे स्थानक बीकेसी मार्गे ८.८ किमी लांबीचा पॉडटॅक्सीचा मार्ग एमएमआरडीए बांधणार आहे. हा मार्ग उन्नत असेल. स्वयंचलित जलद सार्वजनिक वाहतूक प्रणालीअंतर्गत हा प्रकल्प राबविला जाणार आहे. ८.८ किमीच्या मार्गात ३८ स्थानके असतील. प्रति सहा प्रवासी क्षमतेची ही पॉड टॅक्सी ३.५ मीटर लांब, १.४७ मीटर रुंद आणि १.८ मीटर उंच असेल. ताशी ४० किमी वेगाने ही टॅक्सी धावणार आहे. या मार्गासाठी ५००० चौरस मीटर जागेवर डेपो बांधण्यात येणार आहे. या पॉडटॅक्सीतून कुर्ला – बीकेसी किंवा वांद्रे – बीकेसी अंतर पाच ते सहा मिनिटांत पार करता येणार आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक केंद्र अशी ओळख असलेल्या बीकेसीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी वाहतूक व्यवस्थेच्या विविध पर्यायांवर एमएमआरडीएच्या विचार करीत आहे. त्याअंतर्गत एमएमआरडीएने बीकेसीत पॉडटॅक्सी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या प्रस्तावाला एमएमआरडीए प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मंजुरी मिळाल्यानंतर एमएमआरडीएने मार्चमध्ये या प्रकल्पाची उभारणी, देखभाल, संचलनासाठी टेंडर प्रसिद्ध केले. दरम्यानच्या काळात या टेंडरला वारंवार मुदतवाढ देण्यात आली. नुकतेच टेक्निकल टेंडर खुले करण्यात आले असून यात दोन कंपन्यांनी टेंडर भरले आहे. हैदराबादमधील साई ग्रीन मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड आणि चेन्नईतील रिफेक्स इंडस्ट्रीज या कंपन्यांनी हे टेंडर भरले आहे. टेंडरची छाननी करून लवकरच कमर्शियल टेंडर खुले करण्यात येणार आहे. त्यानंतर टेंडर अंतिम करून कंत्राट वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे.