मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या शिवडी-न्हावा शेवा म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. मुंबई महानगर प्रदेशांतर्गत मुंबई ट्रान्स हार्बर लिंकसाठी फास्टॅग व्यवहार संपादन, टॅग जारी करणे आणि इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन एकत्रीकरण सेवांसाठी बँकिंग भागीदाराची निवड करण्याकरिता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) गुरुवारी ई-टेंडर प्रसिद्ध केले आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम गतीने पूर्ण केले जात असून, या पुलावरील ७० ऑर्थोट्रॉपिक स्टिल डेक स्पॅन पैकी केवळ शेवटचे ३ डेक बसविणे बाकी आहे. मे महिन्याच्या शेवटपर्यंत तिन्हीही डेक बसविण्यात आल्यानंतर हा पूल पूर्णपणे जोडला जाणार आहे. शिवडी इंटरचेंजचे कामही मे महिन्याच्या शेवटी पूर्ण होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा हा सागरी सेतू आणखी एक मैलाचा दगड गाठणार आहे. शिवडी न्हावा शेवा ट्रान्स हार्बर लिंकमुळे मुंबईतून नवी मुंबईत १५ मिनिटांत पोहोचता येणार आहे. याठिकाणी ग्रोथ सेंटर, लॉजिस्टिक पार्क, टाउनशिप, टेक्नो हब, फार्मा हब बनविण्यात येणार आहे. समुद्रातील जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मोठ्या लांबीचे हे स्पॅन समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून सुमारे २५ मीटर उंच बांधण्यात येत आहेत. ट्रान्स हार्बर लिंक चिर्ले गावाजवळून मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार आहे. लिंक इस्टर्न फ्री-वे ला जोडणार असल्याने थेट रायगडच्या दिशेने प्रवास शक्य होणार आहे. वरळी कोस्टल रोडही शिवडी वरळी कनेक्टरमार्गे हा प्रकल्प जोडण्यात येणार आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर एमएमआरडीए माध्यमातून टोलनाके बसवण्याचे काम सुरू झाले आहे. या मार्गावर एकूण आठ टोलनाके बसवले जाणार आहेत. शिवडी ते न्हावाशेवा दरम्यान तयार होणारा हा 21 किलोमीटर लांबीचा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प येत्या काही महिन्यात मुंबईकरांसाठी खुला केला जाणार आहे. या मार्गाच्या 21 किलोमीटर अंतरापैकी जवळपास 18 किलोमीटरचे अंतर हे समुद्रावर आहे. हा मार्ग शिवडी येथे सुरू होऊन हा चिर्ले येथे संपणार आहे. बांधकामाव्यतिरिक्त या प्रकल्पात ऑगस्टपर्यंत इतर सुविधा उभारण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठेवले होते. या अनुषंगाने आता या मार्गावर टोल नाके उभारले जाणार आहेत. यासाठीचे टेंडर देखील प्रसिद्ध झाले आहे. दरम्यान या टेंडरअंतर्गत निवड झालेल्या ठेकेदाराला या मार्गावर आठ टोलनाके उभारावे लागणार आहेत. यापैकी दोन नाके हे मुख्य असून ते शिवडी व चिर्ले याठिकाणी मार्गिकेच्या मुखाशी असतील. उर्वरितपैकी तीन नाके प्रवेशाच्या ठिकाणी व तीन नाके बाहेर पडताना असतील. हे सहा नाके मार्गिका बदलाच्या ठिकाणी असतील. सर्व पथकर नाके अत्याधुनिक फास्टॅग व ईटीसी तंत्रज्ञानावर आधारित असतील. टेंडर सादर करण्याची अंतिम तारीख 22 मे 2023 पर्यंत आहे. या आठ टोलनाक्यावर ही यंत्रणा असलेल्या 28 मार्गिका राहणार आहेत. या यंत्रणेमुळे वाहनचालकांना टोलनाक्यावर गाडी थांबवावी लागणार नाही तर ऑटोमॅटिक टोल वसुली होणार आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर प्रवास करतांना कारसाठी शिवडी ते शिवाजीनगर दरम्यान 180 रुपये आकारले जातील, शिवाजीनगर ते चिर्लेदरम्यान 60 रुपये आकारले जातील. तसेच तसेच शिवडी ते चिर्लेदरम्यान संपूर्ण प्रवासासाठी 240 रुपये आकारले जातील. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक वर हलक्या व्यवसायिक वाहनांसाठी शिवडी ते शिवाजीनगर दरम्यान 240 रुपये आकारले जातील. शिवाजीनगर ते चिर्लेदरम्यान 70 रुपये आकारले जातील. शिवडी ते चिर्लेदरम्यान संपूर्ण प्रवासासाठी 310 रुपये आकारले जातील.
तसेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक वर बस आणि अवजड वाहनांसाठी शिवडी ते शिवाजीनगर दरम्यान 420 रुपये आकारले जातील. शिवाजीनगर ते चिर्लेदरम्यान 130 रुपये आकारले जातील. शिवडी ते चिर्लेदरम्यान संपूर्ण प्रवासासाठी 550 रुपये आकारले जातील. बहुचाके असलेल्या वाहनांसाठी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक वर प्रवासादरम्यान 780 रुपये टोल आकारला जाणार आहे. यामध्ये शिवडी ते शिवाजीनगर दरम्यान ६०० रुपये आकारले जातील, तसेच शिवाजीनगर ते चिर्लेदरम्यान 180 रुपये आकारले जाणार आहेत.