मुंबई (Mumbai) : कुलाबा, चर्चगेट, नरिमन पॉईंट भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) (MMRDA) नरिमन पॉईंट-कुलाबा ४ किमी लांबीचा उन्नत मार्ग उभारण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासाठी एमएमआरडीने 315 कोटींचे टेंडर प्रसिद्ध केले आहे. यामुळे या सागरी रस्त्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. तसेच कुलाबा ते नरिमन पॉईंट हा प्रवासही अधिक सुकर होणार आहे. यानिमित्ताने कोस्टल रोडच्या धर्तीवर आणखी एक समुद्री मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
नरिमन पॉईंट ते कुलाबा हा व्हीव्हीआयपी हालचाली आणि वाहतुकीचा मार्ग आहे. मंत्रालय, विधान भवन असलेल्या दक्षिण मुंबईतील या परिसरातील दोन टोकांना जोडण्यासाठी नरिमन पॉईंट ते कुलाबा असा संपूर्ण सागरी मार्ग उभारण्यात येणार आहे. नुकतेच ३१५ कोटी रुपयांच्या या कामासाठी मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) टेंडर काढले आहे. एअर इंडिया इमारती जवळून उभे राहून पाहिले की समुद्राच्या पलीकडे कुलाबा-कफ परेड भाग डोळ्यांना दिसतो. परंतु नरिमन पॉईंटहून तेथे पोहोचण्यासाठी बराच वेळ जातो. चारचाकी वाहनांची संख्या या रहदारीच्या मार्गावर जास्त असते. त्यामुळे प्रवासाला वेळ लागतो.
विधान भवन परिसरात अनेक कॉर्पोरेट कार्यालये, सरकारी एजन्सीची कार्यालये आहेत. या भागात विविध कार्यालये असल्याने कफ परेड ते नरिमन पॉईंट व नरिमन ते पॉईंट ते कुलाबा अशी ये-जा करणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. त्यासाठीच आता थेट समुद्रावरून नवा मार्ग टाकला जाणार आहे. हा मार्ग एकूण चार किमी लांबीचा असेल. नरिमन पॉईंटहून अर्ध गोलाकार असे वळण घेतले जाईल. एकूण मार्गाच्या चार किमीपैकी ८० टक्के मार्ग समुद्रातून जाणार आहे. या मार्गालगत दोन्ही बाजूला जेट्टी, वॉकिंग मार्ग, सायकल ट्रॅकदेखील उभारण्याचे नियोजन आहे. तसेच नरिमन पॉईंट ते कफ परेड या मधल्या जागेत 'दर्शक दालन' उभे केले जाणार आहे. याद्वारे अथांग समुद्राचे दृष्य पाहता येणार आहे. हे सर्व काम ३१५ कोटी रुपयांचे आहे. हे काम कंत्राटदाराला अडीच वर्षात पूर्ण करायचे आहे.