औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबादकरांसाठी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रिंगरोडच्या (Ring Road) कामाचे जाळे अखेर खंडीत होणार असून, यामुळे शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या जालना रस्त्यावरील (Jalna Road) वाहतूक कोंडी कायम राहणार आहे. सरकारने मिटमिटा-सावंगी बायपासला अखेर बायबाय करत या रस्त्याचे काम रद्द केले आहे.
शहराबाहेरून जाणाऱ्या वाहतुकीला स्वतंत्र रस्ता करून देण्याच्या उद्देशाने औरंगाबाद रिंगरोडचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. सहा टप्प्यांतील प्रस्तावित केलेल्या मिटमिटा ते सावंगी हा दहा किलोमीटरचा टप्पा कधी पूर्ण होणार असा प्रश्न टेंडरनामाने सार्वजनिक बांधकाम विभागातील जागतिक बँक प्रकल्पातील अधिकाऱ्यांना विचारला असता, हा रस्ताच सरकारच्या बजेटमधून रद्द करण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळाली. दरम्यान, या टप्प्यात येणारा डोंगराचा अडसर, टाॅवरलाईन अशा काही अडचणी आल्याने त्याऐवजी दुसरा मार्ग निवडण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता. मात्र, पर्यायी जागाच नसल्याने अखेर २४ वर्षांपासून प्रतिक्षा असलेल्या या रिंगरोडचा महत्वाचा टप्पा रद्द केल्याने तो खंडीत झाला. परिमाणी औरंगाबादकरांच्या जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या कॅम्ब्रीज चौक ते नगरनाका दरम्यान वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम राहणार आहे.
विदर्भ व मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांतून पुणे, नाशिककडे जाणाऱ्या तसेच लातूर बीडकडून जळगावकडे जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र रस्ता करण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १९९६ मध्ये रिंगरोडचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानुसार बीड बायपास, केंब्रिज ते सावंगी, सावंगी ते मिटमिटा, मिटमिटा ते गोलवाडी, ए. एस. क्लब ते पैठण रोड असा रिंग रोड सहा टप्प्यात प्रस्तावित करण्यात आला. यातील चार टप्प्यांचे काम पूर्ण झाले आहे. त्यावरून काही वर्षांपासून वाहतूकही सुरू झाली आहे. मात्र तीसगाव ते मिटमिटा या पाचव्या टप्प्यातील महावितरणचे खांब शिफ्टींग रखडल्याने गत चार वर्षापासून काम बाकी आहे. दुसरीकडे मिटमिटा ते सावंगी या रस्त्याचा तिढा मात्र गेल्या २४ वर्षांपासून सुटत नव्हता. या रस्त्यासाठी आजवर भूसंपादन देखील केले गेलेले नव्हते. शहरातील वाहतूक बाहेरून वळविण्यास अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मिटमिटा ते सावंगी या रिंग रोडच्या विकासात टाॅवरलाईन आणि लांबलचक डोंगर तसेच नव्याने झालेल्या समृद्धी महामार्गाची क्राॅसिंग ही सर्वांत मोठी अडचण ठरली होती.
सरकारच्या प्रयत्नांना खीळ
या रस्त्याबाबात सरकारने जागतिक बँक प्रकल्प विभागाला नव्याने जागेचे नियोजन करून प्रस्ताव पाठवा असे देखील कळवण्यात आले होते. त्यावर या रस्त्यातील पाचपीरवाडी ते मिटमिटा याऐवजी पाचपीरवाडी ते अब्दीमंडी असा पर्यायी मार्ग निवडावा अशी शिफारस संबंधितांनी सरकारकडे पाठविली होती. त्यात पाचपीरवाडी ते अब्दमंडी दरम्यान जागा संपादनास अडचण येणार नाही आणि वाहतुकीला अधिक सुलभता मिळू शकते, अशी टिप्पणी देखील करण्यात आली होती. पण आता तिथेही समृद्धी महामार्गाची क्राॅसिंग आल्याने तोही पर्याय संपला.
आता २४ वर्षांची प्रतिक्षाच संपली
गेली २४ वर्ष औरंगाबादकरांना या रिंगरोडमधील मिटमिटा ते सावंगी या सहाव्या टप्प्यातील बायपासची प्रतिक्षा होती. सरकारकडून प्रतिसादच मिळत नसल्याने आजवर जागतिक बॅक प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना त्यावर काहीच हालचाली करता येत नव्हत्या. त्यात या रिंगरोडबाबत प्रश्न विचारताच हा प्रस्तावित रिंगरोडच बजेटमधून रद्द केल्याने आता शासन कधी आणि कोणत्या मार्गाने हा टप्पा कधी गाठणार? असा प्रश्न औरंगाबादकरांपुढे उभा राहिला आहे. गेल्या २४ वर्षांत नुसतीच भूसंपादनाच्या चर्चेत राहिलेला हा टप्पा आता रद्द झाला आहे.