मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेमार्फत (Brihanmumbai Municipal Corporation) गेली काही वर्षे सातत्याने मिठी नदी (Mithi River) शुद्धीकरण कार्यक्रम राबवला जातो. विविध विकासकामांची मोठी मोहीम हाती घेतली जाते. गेल्या १७ वर्षांत मिठी नदीच्या सुशोभीकरण आणि संवर्धनावर सुमारे १ हजार १५० कोटी रुपये खर्च करण्यात आले; मात्र सांडपाणी आणि रसायनयुक्त पाण्याच्या उत्सर्जनामुळे मिठी स्वच्छ करण्यात प्रशासनाला साफ अपयश आले आहे. त्यामुळे, ही कामे मिठीला प्रदूषणाच्या विळख्यातून वाचवण्यासाठी केली जातात का ठेकेदार सांभाळण्यासाठी होतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सध्या मिठी आणि वाकोला नदी पात्राचे उर्वरित रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भिंत व सेवा रस्ता बांधणे, फ्लड गेट बांधणे, उदंचन पंप बांधणे, कठडे बांधणे इत्यादी कामांचे टेंडर काढले असून ही प्रकिया सध्या प्रगतीपथावर आहे. भरती प्रवण क्षेत्रातील मिठी नदी व वाकोला नदीत विविध पातमुखांद्वारे उत्सर्जित होणारे सांडपाणी अडवून मुख्य मलनिःसारण वाहिन्यांमध्ये वळविण्याचे कामही याद्वारे होणार आहे. त्यामुळे मिठी नदीमध्ये उत्सर्जित होणारे सांडपाणी अडविले जाणार असल्याची हमी माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई महापालिकेने दिली आहे. त्याच अनुषंगाने महापालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या मोहिमेची माहिती देण्यात आली आहे.
गलगली यांनी मिठी नदीमध्ये दोन्ही बाजूंकडून उत्सर्जित होणाऱ्या सांडपाण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. याबाबत पर्जन्य जल वाहिनी विभागाचे उप प्रमुख अभियंता विभाष आचरेकर यांनी अनिल गलगली यांना महापालिकेच्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. मुंबई महानगरपालिकेमार्फत मिठी नदीतील प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी सल्लागार मे. फ्रिशमन प्रभू यांची नेमणूक करण्यात आलेली होती. सल्लागाराने सादर केलेल्या तांत्रिक व व्यवहार्यता अहवालानुसार अल्प व दीर्घ मुदतीच्या उपाययोजनांतर्गत कामे सूचविली आहेत.
सल्लागाराने सूचविलेल्या अल्प मुदतीच्या उपाययोजनांतर्गत फिल्टरपाडा, पवई ते डब्ल्यू.एस.पी कंपाऊंड दरम्यान नदीमध्ये उत्सर्जित होणारे सांडपाणी अडवून ते मिठी किनाऱ्यालगत नियोजित मलनिःसारण वाहिन्यांद्वारे वाहून नेऊन डब्ल्यू.एस.पी कंपाऊंड येथे प्रस्तावित मलशुध्दीकरण केंद्रामध्ये प्रक्रिया करण्याचे प्रस्तावित केले आहे. हे काम सद्य:स्थितीत प्रगतीपथावर आहे ते मे २०२२पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
सल्लागाराने सूचविलेल्या दीर्घ मुदतीच्या उपाययोजनांतर्गत गट क्र. 2 अंतर्गत, मुख्यतः (भरती प्रवण क्षेत्र वगळता) छोट्या नाल्यांमधून मिठी नदीमध्ये उत्सर्जित होणारे सांडपाणी अडवून मुख्य मलनिःसारण वाहिन्यांमध्ये वळविणे तसेच मिठी नदीचे उर्वरित रुंदीकरण, खोलीकरण, संरक्षक भिंत व सेवा रस्ता बांधणे इत्यादी कामांचा अंतर्भाव आहे. ही कामे डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.