नागपूर (Nagpur) : नागपूर-हैदराबाद सुमारे साडेपाचशे किलोमीटरचे अंतर अवघ्या साडेतीन तासात पार करता येणार आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी हा रस्ता आठ पदरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हैदराबाद नागपूरच्या अगदी शेजारी येणार आहे.
नितीन गडकरी यांनी देशभर रस्त्यांचे जाळे विणण्याचा संकल्प केला आहे. येत्या वर्षांत देशभरात २५ हजार कोटींचे रस्ते उभारण्याचा त्यांचा मानस आहे. यात नागपूर आणि हैदराबाद मार्गाचाही समावेश करण्यात आला आहे. सध्या हैदराबादचे अंतर कापण्यासाठी रस्ते मार्गाने किमान आठ ते नऊ तास लागतात. त्यामुळे पूर्ण दिवसच जातो. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे प्रमाणाचे हा मार्ग सुपरफास्ट करण्यात येणार आहे. त्याचा डीपीआरसुद्धा तयार झाला आहे.
नागपूरवरून पुण्याला जाण्यासाठी फारशा चांगल्या सुविधा नाहीत. बसने १२ ते १५ तास लागतात. रस्ता आठपदरी नसल्याने आणखी उशिर होते. रेल्वेच्या वेळाही गौरसायीच्या आहेत. दिवाळी, उन्हाळ्यांच्या सुट्यांमध्ये खाजगी ट्रॅव्हल नागपूर-पुणे प्रवास भाडे १० ते १२ हजार रुपये आकारतात. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड लूट होत असते. ही अडचण दूर करण्याचेही त्यांनी ठरवले आहे. समृद्धी मार्गाला जोडून जालनापासून ते नगर आणि पुण्याला जोडण्यासाठी एक मोठा रस्ता तयार केला जाणार आहे. त्यामुळे रस्ते मार्गाने जाण्यायेण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. हे सर्व प्रकल्प येत्या दोन वर्षांमध्ये पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.