मुंबई (Mumbai) : महावितरण राज्यातील सुमारे २ कोटी २५ लाख वीज ग्राहकांना स्मार्ट मीटरने जोडणार आहे. या कामावर सुमारे २७ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यापैकी ५० टक्क्याहून अधिकचे काम अदानी समूहाला मिळाले आहे. महावितरणच्या वीज वितरण क्षेत्रात अदानीला बेस्टनंतर सर्वाधिक मोठे काम मिळाले आहे.
अदानी तब्बल १ कोटी १५ लाख मीटर बसवणार असून भांडूप, कल्याण, कोकण आणि बारामती, पुणे झोनमध्ये ही कामे होणार आहेत. सुमारे १४ हजार कोटींचे हे काम अदानी समूहाला मिळाले आहे. महावितरणने राज्यभरातील वीज ग्राहकांचे सर्वसाधारण डिजिटल मीटर काढून स्मार्ट मीटर बसवण्याबाबत एजन्सी नेमण्याकरिता टेंडर प्रसिद्ध केले होते. त्यामध्ये वेगवेगळ्या झोनसाठी सात कंपन्यांनी टेंडर भरली होती. त्यापैकी अदानी, एनसीसी, मॉनटेसेलटो आणि जिनियस या कंपन्यांना वेगवेगळ्या झोनमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचे काम मिळाले आहे.
भांडूप, कल्याण आणि कोकण या झोनमध्ये 63 लाख स्मार्ट वीज मीटर बसवण्याचे काम अदानी कंपनीला दिले असून त्यावर जवळपास 7594 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. बारामती आणि पुणे झोनमधील 52 लाख 45 हजार स्मार्ट मीटर बसवण्याचे काम अदानी कंपनीला दिले असून त्यावर 6294 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. नाशिक आणि जळगाव झोनमध्ये 28 लाख 86 हजार स्मार्ट मीटर बसवण्याचे काम एनसीसी कंपनीला दिले असून त्याचा खर्च 3461 कोटी रुपये असणार आहे.
लातूर, नांदेड आणि संभाजीनगर झोनमध्ये 27 लाख 77 हजार स्मार्ट मीटर बसवण्याचे काम मॉनटेसेलटो कंपनीला दिले असन त्यावर 3330 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. अकोला आणि अमरावती झोनमध्ये 21 लाख 76 हजार स्मार्ट मीटर बसवण्याचे काम जिनियस कंपनीला दिले असून त्याचा एकूण खर्च 2607 कोटी रुपये असणार आहे.