सातारा (Satara) : सातारा शासकीय मेडिकल कॉलेजच्या (Satara Government Medical College) इमारत आराखड्यास मान्यता मिळाल्यामुळे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात इमारतीच्या बांधकामाची ४९५ कोटींची टेंडर (Tender) प्रक्रिया होणार आहे. यामध्ये दिग्गज कंपन्या टेंडर प्रक्रियेत उतरणार असून, या कंपन्यांशी संबंधित राजकीय नेते मंडळीही टेंडर आपल्या संबंधित कंपनीला मिळावे प्रयत्न करणार आहेत. यासाठी या नेते मंडळीत चढाओढ लागणार आहे. महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांनी यावर विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे; पण, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे या सर्व प्रक्रियेवर बारकाईने लक्ष आहे. तरीही या टेंडर प्रक्रियेत घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.
सातारा शासकीय मेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया यावर्षीपासून होणार आहे. त्यासाठीची सर्व तयारी झालेली आहे. प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मध्यवर्ती प्रयोगशाळेचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मागील आठवड्यात झाले आहे. त्याचे कामही वेगाने केले जाणर आहे. आता या वैद्यकीय महाविद्यालयाचा सुसज्ज असा एकूण ४९५ कोटी रुपयांचा इमारत बांधकाम आराखडा तयार झाला आहे. या आराखड्यास वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या सर्व संचालकांनीही मान्यता दिली आहे. बारामती व दिल्ली वैद्यकीय महाविद्यालयांच्या धर्तीवर हा आराखडा तयार केला आहे. त्यामुळे या इमारतीचे विशेष आकर्षण राहणार आहे.
आराखड्यातील बांधकामे चार टप्प्यांत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निरीक्षणाखाली होणार आहेत. पहिल्या टप्प्यात मुख्य इमारत व त्यानंतर इतर इमारतींची बांधकामे होतील. साधारण मार्चपर्यंत प्रत्यक्ष बांधकामास सुरवात होण्याची शक्यता वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. आर. डी. चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. इमारतीच्या बांधकामाची ४९५ कोटी रुपयांची टेंडर प्रक्रिया जानेवारीच्या अखेरीस काढण्यात येणार आहे.
सातारा मेडिकल कॉलेजच्या इमारत बांधकामासाठी दिग्गज कंपन्या टेंडर प्रक्रियेत उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कंपन्यांशी संबंधित राजकीय नेते मंडळीही टेंडर आपल्या संबंधित कंपनीला मिळावे प्रयत्न करणार आहे. यासाठी या नेते मंडळीत चढाओढ लागण्याची शक्यता अधिक आहे. सध्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत असून, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसच्या नेत्यांनीही यावर विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे; पण उपमुख्यमंत्री पवार यांचे या सर्व प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. मात्र, इतक्या मोठ्या रकमेचे टेंडर मिळविण्यासाठी कंपन्यांकडून नेते मंडळींना साकडे घालण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. त्यामुळे या टेंडर प्रक्रियेत घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.
सातारा मेडिकल कॉलेजच्या इमारत बांधकाम आराखड्यास सर्व संचालक मंडळाने मान्यता दिलेली आहे. त्यामुळे जानेवारीअखेरपर्यंत बांधकाम टेंडर प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. एकूण ४९५ कोटींच्या इमारत आराखड्यानुसार टप्प्याटप्प्याने बांधकाम होणार आहे. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे निरीक्षण राहणार आहे.
- डॉ. आर. डी. चव्हाण, डीन, सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय