मुंबई (Mumbai) : महाराष्ट्रातील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर विमान व रॉकेटचे इंजिन बनवणारी फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रनने महाराष्ट्रातून काढता पाय घेतला आहे. कंपनीने आपला विमान इंजिन दुरुस्ती देखभाल प्रकल्प नागपूरच्या मिहानऐवजी हैदराबादकडे वळवला आहे. कंपनीची सुमारे १,१०० कोटींची प्राथमिक गुंतवणुकीची तयारी होती. मात्र, जमीन मिळवण्यास दिरंगाई झाल्यामुळे हा प्रकल्प हैदराबादला गेल्याचे समजते. त्यामुळे सॅफ्रन कंपनीने हा प्रकल्प हैदराबादला हलवण्याचा निश्चय केला आहे. यावरुन आता पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. विरोधकांनी या मुद्यावर राज्य सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात होणारे मोठे प्रकल्प इतर राज्यात जात आहेत. सुरुवातीला वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला. पाठोपाठ बल्क ड्रग पार्क आणि त्यानंतर टाटा एअरबसचा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट हा नागपूरमध्ये होणारा प्रकल्प देखील गुजरातमधील बडोदा येथे गेला आहे. त्यापाठोपाठ सॅफ्रनचा नंबर लागला आहे. विमान आणि रॉकेटचे इंजन बनवणारी फ्रान्सची बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रनने महाराष्ट्रातून काढता पाय घेत आपला विमान इंजन दुरुस्ती देखभालचा प्रकल्प हैदराबादमध्ये वळवला आहे. सॅफ्रन कंपनी नागपूरच्या मिहानमध्ये विमान इंजिनाच्या देखभाल दुरुस्तीचे युनिट टाकणार होती. सॅफ्रन कंपनी भारतीय आणि परदेशी व्यावसायिक विमानामध्ये वापरले जाणारे लीप वन ए तसेच लीप वन बी इंजिनच्या देखभाल दुरुस्तीचे युनिट नागपूरच्या मिहानमध्ये टाकणार होती. वर्षाला याठिकाणी 250 विमानांची इंजिन दुरुस्ती व देखभाल केली जाणार होती. त्यासाठी कंपनीची 1 हजार 115 कोटींची प्राथमिक गुंतवणुकीची तयारी होती. या प्रकल्पाच्या माध्यमातून पाचशे ते सहाशे कुशल कामगारांना रोजगार मिळणार होता. प्रशासकीय विलंबामुळे हा प्रकल्प हैदराबादला गेल्याची माहिती आहे. कंपनीच्या सीईओंनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन प्रकल्प हैदराबादला हलवण्याची माहिती दिली आहे.
फ्रान्सची बहुराष्ट्रीय सॅफ्रन कंपनी गेल्या दोन वर्षापासून नागपूरच्या मिहानमध्ये प्रकल्पासाठी जमिनीची चाचपणी करत होती. मात्र, त्यांना आवश्यक तशी जमीन या ठिकाणी उपलब्ध झाली नसल्याची माहिती आहे. या कंपनीने दोन शहरांचा पर्याय ठेवला होता. यामध्ये एक नागपूर आणि दुसरा हैदराबाद. मात्र, मिहानमध्ये जमिनीची चाचपणी करत असताना त्यांना जमीन मिळायला विलंब झाला. तसेच महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता देखील आहे. त्यामुळे सॅफ्रन कंपनीने आपला प्रकल्प अखेर हैदराबादला हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
विरोधकांनी या मुद्यावर राज्य सरकारला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सत्तेच्या हव्यासापोटी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वातावरण अस्थिर केले असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. 2014 नंतरच महाराष्ट्रावर वक्रदृष्टी का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. वेगळा विदर्भ करण्याच्या नावावर सत्तेत आलेले लोक, वेगला विदर्भ तर सोडाच पण विदर्भावर किती अन्याय करतात हा मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रात पाण्याची विजेची मुबलकता आहे. तसेच आपल्याकडे कौशल्य असलेले मनुष्यबळ देखील उपलब्ध आहे, तरी प्रकल्प राज्याच्या बाहेर जात आहेत. सत्तेच्या हव्यासापोटी महाराष्ट्राच्या जनतेचे सरकारने नुकसान केल्याचे लोंढे म्हणाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारवर टीका केली. महाराष्ट्रात जे काही चालले आहे ते पाहून दु:ख होत असल्याचे सुळे म्हणाल्या.