मुंबई (Mumbai) : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या (Mumbai-Ahmedabad Bullet Train) शेअर्स खरेदीसाठी ६ कोटींचा निधी दिल्यानंतर पालघर येथील जागा हस्तातंरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या जागांसाठी एकूण 2 कोटी 19 लाख 17 हजार 500 रुपये इतके मूल्यांकन ठरविण्यात आले आहे. निधी दिल्यानंतर राज्य सरकारने तातडीने जागाही हस्तांतरित केली आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी राज्याच्या दुग्धव्यवसाय आयुक्तांच्या अखत्यारितील पालघर येथील जागा हस्तांतरांचा प्रस्ताव दुग्धव्यवसाय विभागाने राज्य सरकारकडे पाठविला होता. मात्र तो मंजूर करण्यात आला नव्हता. नव्या सरकारने हा प्रस्ताव निकाली काढत बुलेट ट्रेनच्या कामाला गती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पालघर येथील केळवे रोड येथील सुमारे 0.46.03 क्षेत्र इतकी जागा आणि मान येथील 0.36.69 क्षेत्र इतकी जागा हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.
या निर्णयानुसार केळवे रोड येथील जागेसाठी 1 कोटी 06 लाख 73 हजार 500 रुपये इतके मूल्यांकन निश्चित करण्यात आले आहे. तर मान येथील जागेसाठी 1 कोटी 12 लाख 44 हजार रुपये इतके मूल्यांकन निश्चित करण्यात आले आहे. मूल्यांकन करण्यात आलेली रक्कम हायस्पीड रेल्वे प्रोजेक्ट यांच्याकडून घेण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.