मुंबई (Mumbai) : जेमतेम मोजक्या बहिणींना योजनेचा पहिला हफ्ता मिळाला, परंतु ढोल पिटण्यासाठी मात्र १९९ कोटी ८१ लाख रुपयांचे बिल राज्याच्या तिजोरीवर लावण्यात आले. महायुती सरकारच्या घोषणांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आधीच २७० कोटींचा निर्णय झाला असताना आता फक्त लाडकी बहीण योजनेच्या प्रचारसाठी तब्बल १९९ कोटी ८१ लाख खर्च केला जाणार आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी राज्य सरकारवर केली आहे.
विशेष म्हणजे १५ ऑगस्ट सुट्टीचा दिवस असताना हा निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. सुट्टीच्या दिवशी तर सोडा, कामकाजाच्या दिवशी सुद्धा मंत्रालयात जनतेची कामे होत नाहीत. दुसरीकडे मात्र महायुतीत सहभागी पक्षांच्या हिताचे सरकारी निर्णय घेण्यासाठी १५ ऑगस्टचा दिवस सुद्धा सत्ताधारी आणि शासकीय यंत्रणा सोडत नाही. स्वतःच्या हितासाठी राबणारे किती हे तत्पर सरकार असेच म्हणावे लागेल. या सरकारला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, युवकांना नोकऱ्या द्यायला पैसे नाहीत, पण स्वतःची बढाई मारण्यासाठी जाहिरातीवर मात्र भरमसाठ खर्च सुरू आहे.
दिल्लीत बसलेल्या सरदारांना खुश ठेवण्यासाठी आधीच महाराष्ट्र गहाण ठेवला आहे, येणाऱ्या विधानसभेत मतांसाठी महायुतीतील तीनही पक्ष मिळून महाराष्ट्र विकायला पण कमी करणार नाहीत, असे टीकास्त्र वडेट्टीवार यांनी सोडले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेपर्यंत सरकारी योजना पोहोचाव्यात यासाठी विविध माध्यमातून जाहिरातबाजी करण्यात येत आहे. त्यासाठी यापूर्वीच २७० कोटींच्या जाहिराती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या लोकाभिमुख योजना, विकास प्रकल्प, विविध योजना, ध्येय धोरणे, महत्वाकांक्षी प्रकल्प, विकास कामे व लोककल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, लखपती दिदी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना, मुलींना मोफत व्यावसायिक उच्च शिक्षण, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना, कृषी शेतकरी विमा, पायाभूत सुविधा (एमटीएचएल, कोस्टल रोड, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, ग्रीनफिल्ड कोकण द्रुतगती मार्ग, विरार ते अलिबाग बहुद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्प), उद्योग, नमो शेतकरी महासन्मान निधी, आरोग्य (महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना), हर घर जल, राष्ट्रीय स्मारके (हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक), आदिवासी आश्रमशाळा, शिधावाटप, ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना, मराठा आरक्षण, सुरक्षा, रोजगार, सागरी सुरक्षा, शिक्षण, सामाजिक न्याय आदी योजनांची जाहिरात करण्यात येणार आहे.