मुंबई (Mumbai) : हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) मुंबई - नागपूर (Mumbai-Nagpur) समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) अपघात रोखण्यासाठी आणि वन्यजीवांच्या संरक्षणाच्या दृष्टीने अंडर आणि ओव्हरबायपास उभारण्यात येत आहेत. त्यासाठी तब्बल 350 कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. या दोन्ही बायपास परिसराला जंगलाचे स्वरुप देण्यासाठी गर्द झाडे लावण्यात आली आहेत. वन्यजीवप्राणी रस्त्यावर येऊन कोणताही अपघात होऊन जिवितहानी टाळण्याचा प्रयत्न महामार्गावर करण्यात आला आहे.
महामार्गातील भुयारी मार्गातून जाताना प्राण्यांना अंधाराचा अडथळा येऊ नये म्हणून तिथे सौरऊर्जेतून प्रकाशाची व्यवस्था केली जाणार आहे. तर ध्वनिरोधक यंत्रणा उभारताना जंगलातील विस्तीर्ण झाडे, झुडपे, वेली यांचा आधार घेण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाच्या आजूबाजूने प्राण्यांच्या नजरेत येईल, त्यांना त्रास होईल, मुक्त संचारात अडथळा येईल, अशी कोणतीही यंत्रणा महामार्गाच्या दर्शनी भागात उभारण्यात येणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.
समृद्धी महामार्ग परिसर, भुयारी, अप्पर मार्गातून वन्यप्राणी जात असताना त्यांना वाहनांचा आवाज, तेथील व्यवस्थेचा कोणताही त्रास होणार नाही अशा पद्धतीने ही अत्याधुनिक यंत्रणा जंगली प्राण्यांच्या संरक्षणासाठी उभारली जाणार आहे. अभयारण्यातील अनेक भागात धरणांच्या माघार पाणलोटाचे पाणी पसरले आहे. महामार्गाखाली असे पाणलोट येणार आहेत. अशा ठिकाणी वन्यजीवांना विनाअडथळा पाणी पिता यावे, संचार करता यावा यासाठी पसरट खड्यांची व्यवस्था केली जाणार आहे. जंगली भागात महामार्ग ओलांडताना आतापर्यंत वाघांसह अनेक जंगली प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.
रस्त्याच्या दूतर्फा जंगलाच्या झुडुपांचे कवच राहणार आहे. याठिकाणी बांबू लागवड सुद्धा लावण्यात येणार आहे. बांबू लागवड रस्त्याच्या दुतर्फा असणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्ग पर्यावरण स्नेही तथा पर्यावरण पूरक म्हणून उदयास येईल असा विश्वास एमएसआरडीसीचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.