मुंबई (Mumbai) : राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमधून नागरिकांची सुटका होण्यास नोव्हेंबर उजाडणार आहे. पावसाळा संपताच खड्डे दुरुस्तीला येत्या एक ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. नोव्हेंबरअखेरपर्यंत सर्व खड्ड्यांचे काम पूर्ण होणार आहे. या कामासाठी सुमारे ५०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
राज्य महामार्ग आणि जिल्हा मार्गावरील खड्डे पूर्णपणे भरण्याचे काम ऑक्टोबरपासून सुरु करून नोव्हेंबर अखेरपर्यंत सर्व रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत आणले जातील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सतीश साळुंखे यांनी शुक्रवारी दिली. पावसामुळे तसेच निकृष्ट कामामुळे राज्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. यावर्षी खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या अभियंता दिनाच्या कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ‘आपली चूक होत असल्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडत आहेत, अशा शब्दात विभगातील अभियंत्यांचे कान उपटले होते. त्यानंतर साळुंखे यांनी तातडीने निर्णय घेऊन वार्षिक देखभाल दुरूस्तीच्या निधीतून खड्डे भरण्याचे काम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
साळुंखे यांची माहिती
- महामार्ग आणि जिल्हा महामार्ग मिळून जवळपास ९८ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते
- रस्त्यांवर सध्या ३५ ते ४० टक्के खड्डे
- खड्डे भरण्यावर जवळपास ५०० कोटी रुपयांचा खर्च करणार
- नव्या रस्त्यांची कामे हाती घेण्यासाठी नाबार्डकडून २०२२ -२३ या वर्षासाठी ७५० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार