मुंबई (Mumbai) : राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्रातून ३ मेगा प्रकल्प गुजरातमध्ये गेले आहेत. २ लाख कोटी किंमतीच्या या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राचे आर्थिक नुकसान तर झालेच आहे. शिवाय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सुमारे ३ लाख रोजगार निर्मितीलाही महाराष्ट्र मुकणार आहे.
काही दिवसांपूर्वी वेदांता-फॉक्सकॉनचा महाराष्ट्रात येऊ घातलेला सुमारे दीड लाख कोटी रुपयांचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातने पळवला आहे. सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रोजेक्ट महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारकडून बोलणी सुरू होती. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच हा प्लांट गुजरातमध्ये उभारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यामध्ये हा प्रोजेक्ट्स होणार होता. सेमीकंडक्टर निर्मिती देशात सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने धोरण आखले आहे. आगामी काळात सेमीकंडक्टरची वाढती मागणी लक्षात घेता केंद्र सरकारने याबाबत विशेष धोरण आखले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात वेदांता सोबत झालेल्या चर्चेनुसार, सेमीकंडक्टरचा प्रकल्प हा पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे सुरू होणार होता. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात २ लाख रोजगार निर्मिती झाली असती. यातील 30 टक्के हा थेट रोजगार तर, सुमारे 50 टक्के अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती अपेक्षित होती.
उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारमार्फत देशात चार मोठे बल्क ड्रग पार्क उभारण्यात येणार आहेत. यातील एक प्रकल्प महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात होणार होता. रायगडमध्ये मुरुड-रोहा तालुक्यातील प्रस्तावित बल्क ड्रग पार्क मुंबई कॉरिडॉर अंतर्गत उभारण्यात येणार होता. त्यासाठी ५ हजार एकर जमीन आवश्यक होती, त्यातील अडीच हजार एकर जमीन १७ गावांतून संपादित केली जाणार होती. तर एक हजार एकर जमीन सरकारच्या मालकीची होती. या पार्कसाठी जमीन अधिग्रहणाचे कामही सुरू झाले होते. राज्याच्या ६२ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यपालांनी केलेल्या भाषणात या पार्कचा उल्लेखही होता. या पार्कच्या माध्यमातून वैद्यकीय सोयी उपलब्ध होणार होत्या, शिवाय ३० हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. त्यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहिले होते. मविआच्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मंजुरीही मिळाली होती. रायगडमध्ये प्रस्तावित सुमारे ७७ हजार रोजगार देणारा बल्क ड्रग पार्कही राज्याच्या हातातून निसटून गुजरातला गेला आहे. हा प्रकल्प गुजरातमधील भरूचमध्ये उभा राहणार आहे.
नुकताच टाटा एअरबसचा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट हा नागपूरमधील प्रकल्पही गुजरातमधील बडोदा येथे गेला आहे. या प्रकल्पाची किंमत 22 हजार कोटी इतकी आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टाटा एअरबसचा प्रोजेक्ट नागपूरमधील मिहानमध्ये होईल असा विश्वास होता. पण गुरुवारी हा प्रोजेक्ट गुजरातला गेल्याचे समोर आले आहे. टाटा एअरबसच्या या प्रोजेक्ट्समुळे प्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष सहा हजार लोकांना रोजगार उलब्ध होणार होता.