वाई (Wai) : वाईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या कृष्णा नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. कोकणातल्या सावित्री नदीवरील पुलाचे काम अवघ्या १६० दिवसांत पूर्ण केलेल्या टीअँडटी इन्फ्रा लि. (T&T Infra Ltd) या पुण्याच्या ठेकेदार (Contractor) कंपनीकडून हे काम सुरू आहे. ठेकेदार कोणीही असो एरवी कोणत्याही मोठ्या प्रकल्पाच्या कामाच्या दर्जाबाबत लोकांच्या अनेकदा तक्रारी राहतात. इथे वाईत मात्र वेगळे घडतंय. लोकांना या ठेकेदाराबद्दल पूर्ण विश्वास असून, या पुलाचे काम दर्जेदार होणार आणि तेही वेळेत पूर्ण होणार याची हमी इथले लोकच देताना दिसतात. त्याचे कारणही तसेच आहे.
टीअँडटी इन्फ्रा ही कंपनी पुण्याची असली, तरी तिचे मालक शिवाजीराव थोरवे मूळचे वाई तालुक्यातील रहिवासी आहेत. त्यामुळे माझ्या गावाचं काम म्हणून ते या कामात जराही कसर ठेवणार नाहीत, असे वाईकर म्हणतात. हे काम निर्धारित वेळेपूर्वी पूर्ण करण्याचा संकल्प टीअँण्डटी इन्फ्राने केला आहे. पावसाळ्यापूर्वी पूल वाहतुकीसाठी उपलब्ध करण्याच्यासाठी आवश्यक नियोजन केले आहे.
वाई पालिकेने शहरातील उत्तर-दक्षिण भागाला, किसनवीर चौक ते सोनवीरवाडी यांना जोडणारा कृष्णा नदीवरील जुना ब्रिटिशकालीन पूल नुकताच पाडला. वाईकरांच्या कित्येक पिढ्यांनी या पुलावरून कृष्णा नदी पार केली आहे. या ठिकाणी नवीन प्रशस्त पुलाचे बांधकाम पालिकेने हाती घेतले आहे. त्यासाठी आमदार मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून नगरपरिषदांच्या वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेतून राज्य सरकारने १५ कोटींचा निधी जुलै २०२०-२१ मध्ये प्राप्त करून दिला. कृष्णा नदीवरील ब्रिटिशकालीन पूल १४० पेक्षा अधिक वर्षे जुना होता. या पुलाचे कराडच्या गर्व्हमेंट कॉलेज ऑफ इंजिनियरींगकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यात आले होते. त्यांनी जुना पूल वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचा अहवाल दिला होता. हे काम करण्यासाठी हेरिटेज समिती व इतर सर्व अनुषंगिक परवानग्या (तांत्रिक व प्रशासकीय) घेण्यात आल्या आहेत.
या कामासाठी तीन टेंडर आल्या होत्या. त्यापैकी टीॲंडटी इन्फ्रा लि. पुणे यांची अंदाजे रक्कम १४ कोटी ९३ लाख २६ हजार ३३५ रुपयांचे टेंडर मंजूर करण्यात आले. त्यांना २० ऑगस्ट २०२१ रोजी कार्यादेश देण्यात आला आहे. या प्रस्तावित नवीन पुलाची एकूण लांबी सुमारे ८१ मीटर तर उंची ७.५० ते ८.०० मीटर आहे. पुलाची रुंदी १२.०० मीटर आहे. यामध्ये ९.०० मी 'कॅरेज-वे 'आणि पुलाच्या दोन्ही बाजूस पादचाऱ्यांना जाण्या-येण्यासाठी १.५० मी. रुंदीचे पादचारी मार्ग (फुटपाथ) असेल. यावर आकर्षक पेव्हर ब्लॉकची तरतूद घेतली आहे. त्याखालून पाण्याचे लाईन्स, इलेक्ट्रिक व टेलिफोन लाईन्सचे नियोजन केले आहे. नदी पात्रातील पाण्याचा मुख्य प्रवाह, पावसाळ्यात पुराचे पाणी दोन्ही बाजूने वाहून जावे, पूल सुबक व आकर्षक दिसावा यासाठी पुलास १३.५० मी.रुंदीच्या पाच कमानी (आर्च) रचना करण्यात आली आहे. महापुराच्या वेळी तसेच इतरवेळी कृष्णा नदीच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता यावा यासाठी पुलावर नदीच्या दोन्ही बाजूस ७ फुट बाय १० फूट मापाच्या ४ ठिकाणी प्रोजेक्टेड बाल्कनी घेतल्या आहेत. आर.सी.सी. फौंडेशन आणि पिअर्ससाठी तसेच आरसीसी डेकच्या पोर्टल स्लॅबसाठी एम-३५ ग्रेडचे कॉक्रीट वापरण्यात येणार आहे.
हे काम पूर्णत्वाचा कालावधी १८ महिने आहे. मात्र त्यापूर्वीच काम पूर्ण करण्याचा निर्धार ठेकेदार कंपनीने केला आहे. त्यासाठी व्याहळी येथे रेडिमिक्स काँक्रीट प्रकल्प तसेच सातारा येथे प्रिकास्ट हायर ग्रेड काँक्रीट एम ५० सुमारे १४०० ब्लॉक तयार करण्याचे काम सुरू केले आहे. पुलाच्या कमानीच्या खड्ड्याचे काम पूर्ण झाले असून संरक्षक भिंतीचे काम सुरू असल्याची माहिती कंपनीचे सरव्यवस्थापक सतीश थोरवे व साईट इन्चार्ज संभाजी येवले यांनी दिली. नवीन पूल हा एकूण ४० फूट रुंदीचा म्हणजे जुन्या पुलाच्या दुप्पट रुंदीचा असल्याने त्यावरून होणाऱ्या वाहतुकीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर कायमस्वरूपी सुटणार आहे .पुलाच्या हेरीटेज लुक व आर्किटेक्चरल इलेमेंट्समुळे वाई शहराच्या सांस्कृतिक वारशात व सौंदर्यात मोलाची भर पडणार आहे.
‘‘ठेकेदार कंपनीचे मालक वाई तालुक्यातील असून, त्यांना आपल्या भागाविषयी आस्था आहे. त्यामुळे पुलाचे बांधकाम मजबूत होईल. त्यांनी महाड येथील सावित्री नदीवरील पूल अवघ्या १६० दिवसात बांधला असल्याने नियोजित वेळेत काम पूर्ण होईल, असा विश्वास आहे.’’
- किरणकुमार मोरे, मुख्याधिकारी, वाई नगरपालिका