मुंबई (Mumbai) : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली ठाणे-बोरिवली दरम्यान दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या टेंडरसाठी 'लार्सन अँड टुब्रो' आणि 'मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड' या दोन कंपन्या स्पर्धेत आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हे टेंडर प्रसिद्ध केले आहे. या प्रकल्पावर सुमारे ११ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीमुळे बोरिवली आणि ठाणे दरम्यान प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. ठाणे ते बोरिवली या अंतरासाठी घोडबंदरमार्गे २३ किमी अंतर असून हे अंतर गर्दीच्या वेळी पार करण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी एक तासाहून अधिक काळ लागतो. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने २०१५ मध्ये ठाणे-बोरिवली भूमिगत रस्त्याची योजना आखली होती. परंतु २०२० मध्ये हा प्रकल्प मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आल्याने 'एमएमआरडीए'कडून या प्रकल्पावर काम सुरू झाले.
यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली दुहेरी बोगद्यासह रस्ते बांधणी करण्यात येणार आहे. त्यानुसार आता या प्रकल्पासाठी दोन कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. तांत्रिक बाबींची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, बोगद्याच्या आत २३.६८ किमी रस्ते आणि आणखी २ किमी संपर्क रस्ते बांधण्यासाठी आर्थिक टेंडर उघडले जाणार आहे. सर्वात कमी दराचे टेंडर भरलेल्या कंपनीला हे काम मिळणार आहे.
बोगद्याचा भाग संरक्षित वनक्षेत्रातून जात असल्यामुळे बोगद्याच्या खोदकामासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासंदर्भात ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मशिन्स’ या संस्थेचा अभिप्राय घेण्यात आला. या भागात टनेल बोअरिंग मशिन्सच्या सहाय्याने बोगद्याचे खोदकाम करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या संदर्भात चर्चा करून ११.८४ किमी लांबीचा हा प्रकल्प तयार करण्यात आला असून त्यामध्ये १०.२५ किमी बोगदा आणि १.५५ किमी लांबीचा जोडरस्त्याचा समावेश आहे.