मुंबई (Mumbai) : मुंबईतील सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड विस्ताराचा पहिल्या टप्प्यातील सुमारे ६५० कोटी खर्चून बांधण्यात आलेला रस्ता पहिल्याच पावसात खड्डेमय झाला आहे. अवघ्या चार महिन्यात रस्ता खड्डेमय झाल्यामुळे कामाचा निकृष्ट दर्जा उघड झाला आहे. विशेष म्हणजे, फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण झाले होते. त्यामुळे ठेकेदाराच्या कामावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (SCLR) हा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे दरम्यान प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी एक उन्नत मार्ग आहे. बीकेसी व कुर्ला भागातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि विद्यमान सांताक्रूझ चेंबूर रस्त्या द्वारे (एससीएलआर) पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाना जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, एमएमआरडीए राज्य शासनाच्या सहकार्याने सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता प्रकल्पाचा विस्तार दोन भागात करत आहे. त्यानुसार पहिल्या भागात ५.९ किमीचा उन्नत मार्ग असणार आहे.
प्रकल्पाच्या पहिल्या भागतील १.८ कि.मी. लांबीचा महाराष्ट्र राज्य अग्निशामक इमारत ते रजाक जंक्शन पर्यंत उन्नत मार्ग (अप रॅम्प) आणि महानगर टेलिकॉम निगम लि. (बीकेसी) ते लालबहादुर शास्त्री पुलाला (कुर्ला) जोडणारा १.२६ किमीची उन्नत मार्ग (अप रॅम्प) बांधण्यात आले आहेत. हे दोन्ही उन्नत मार्ग ज्यांची रुंदी ८.५ मी. इतकी असून ही २ लेनची मार्गिका १० फेब्रुवारी २०२३ पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करत वाहतुकीस खुली करण्यात आली.
यापैकी कपाडिया नगर येथील कुर्ला वरून सांताक्रूझच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर खड्डे पडले आहेत. पावसामुळे पाणी साचून आता या खड्ड्यामुळे नागरिकांना या पुलावरून वाहतूक करणे त्रासदायक झाले आहे. या मार्गाने दररोज वाहतूक करणाऱ्या नागरिकांनी एमएमआरडीएच्या व्यवस्थापनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी तातडीने या कामाचा अहवाल मागविला असून हे खड्डे लवकरात लवकर भरण्याचे आदेश दिल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.