मुंबई (Mumbai) : मुंबई-गोवा महामार्गावरील वडखळ ते इंदापूर या ४२ किलोमीटर रस्त्याची अक्षरशः चाळण उडाली आहे. कासू (वडखळ) ते इंदापूर या महामार्गासाठी तब्बल ४३० कोटी रुपयांचे टेंडर मंजूर झाल्यानंतरही रस्त्याची साडेसाती काही संपलेली नाही.
मुंबई-गोवा महामार्गाचे गोव्यापर्यंत एकूण 11 टप्पे असून त्यातील 10 टप्प्यांची कामे सार्वजनिक बांधकाम खाते, तर वडखळ ते इंदापूर या टप्प्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करत आहे. रायगड जिह्यात वडखळ ते इंदापूर आणि पुढे माणगाव ते कशेडी असे दोन टप्पे आहेत. त्यातील वडखळ ते इंदापूर महामार्गाचे काम 13 वर्षांपासून रखडल्याने या रस्त्याची चाळण झाली आहे. काही खड्डे तर एक फूट खोल आणि चार फूट व्यास इतके मोठे आहेत. या 42 किलोमीटर मार्गाचे काम ‘कल्याण टोल इन्फ्रा’ या ठेकेदाराला सोपवण्यात आले असून यासाठी सरकारने तब्बल 430 कोटी रुपयांचे टेंडर मंजूर केले आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत संथगतीने काम सुरू आहे. वडखळ ते कशेडी या मार्गावर अपघाताचे तब्बल 22 जीवघेणे ब्लॅक स्पॉट आहेत. नागोठणे, सुकेळी खिंड, खांब, पुई, मुगवली, कशेणे, ढालघर, तिलोरे, रेपोली, लोणेरे, टेमपाले, तळेगाव, गांधारपाले, टेमपाले, लाखपाले, वीर फाटा, धामण देवी, लोहारे, दासगाव, पारले, चोळई या ब्लॅक स्पॉट ठिकाणी सर्वाधिक अपघात होऊन वाहनचालक आणि प्रवाशांचे बळी गेल्याची नोंद आहे. ठेकेदाराच्या बेफिकीर कारभाराकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी डोळेझाक करत आहेत, त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
वडखळ ते माणगाव या महामार्गावर अर्धवट अवस्थेत मधोमध बांधलेले कामत हॉटेल (नागोठणे), खांब (कोलाड), रातवड (इंदापूर) आणि माणगाव येथे चार उड्डाणपूल आहेत. या उड्डाणपुलांची दुरावस्था झाली आहे. त्याचे चिरे निखळले असून उड्डाणपुलांच्या भिंतीतून झाडेझुडपे वाढली आहेत. वेगात येणाऱ्या चालकांचा अंदाज चुकल्याने या उड्डाणपुलांच्या एन्ट्रीवर आदळून अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. त्याच्या एक आठवडा आधीच मुंबई, ठाणे, पुण्यातील चाकरमानी कोकणाकडे खासगी वाहनांनी निघतील. या उत्सवादरम्यान महामार्गावरील वर्दळ वाढणार आहे. त्यामुळे वडखळ ते इंदापूरमधील रस्त्यावर चाकरमानी खड्डेकोंडीत अडकून पडण्याची भीती आहे. तसेच इंदापूर आणि माणगाव गावाबाहेरून बाह्य वळणे काढण्याचे काम सुरू आहे. मात्र या दोन्ही बाह्यवळणांचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे.