मुंबई (Mumbai) : नाशिक ते पुणे (Nashik To Pune) या 230 किलोमीटर मार्गावर लवकरच सेमी बुलेट ट्रेन धावणार आहे. सव्वाशे किलोमीटर प्रति तास या वेगाने ही बुलेट ट्रेन धावणार असून 230 किलोमीटरचे अंतर अवघ्या दोन तासात पूर्ण होणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 14000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सध्या नाशिक ते पुणे दरम्यानच्या मार्गावरील जमीन संपादनाचे काम वायूवेगाने सुरु आहे. राज्यातील सत्ताबदल झाल्यानंतर विविध प्रकल्पांना वेग येत आहे. रखडलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला पुन्हा एकदा गती मिळाली आहे. त्याचसोबत राज्यात महारेलच्या माध्यमातून विविध प्रकल्प प्रस्तावित आहेत, त्यांनाही गती येणार आहे.
नाशिक ते पुणे या 230 किलोमीटर मार्गावर लवकरच सेमी बुलेट ट्रेन धावणार आहे. सव्वाशे किलोमीटर प्रति तास या वेगाने ही बुलेट ट्रेन धावणार असून; 230 किलोमीटरचे अंतर अवघ्या दोन तासात पार केले जाईल, अशी माहिती महारेलमधील उच्चपदस्थांनी दिली. या रेल्वे प्रकल्पासाठी नाशिक ते पुणे दरम्यानच्या मार्गावरील भूमी अधिग्रहणाचे काम सध्या वेगाने सुरु आहे. हा प्रकल्प 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र कोरोनामुळे यात काही अडचणी आल्यामुळे प्रकल्पाला थोडा विलंब होण्याची शक्यता आहे.
पुणे नाशिक सेमी बुलेट ट्रेन प्रकल्प हा सुमारे 14000 कोटी रुपयांचा आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडून तसेच राज्याकडून प्रत्येकी 50 टक्के गुंतवणूक करण्यात येणार आहे. यामध्ये केंद्राकडून 20% प्रत्यक्ष गुंतवणूक, राज्याकडून 20% प्रत्यक्ष गुंतवणूक आणि 40% कर्जाच्या माध्यमातून पैसे उभारले जाणार आहेत. या सेमी बुलेट ट्रेनमुळे प्रवासी आणि मालवाहतूक जलद गतीने होणार आहे. ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना रोजगारासाठी पुणे-नाशिक येथे स्थलांतरीत होण्याची गरज भासणार नाही. पुणे आणि नाशिक या दोन मोठ्या शहरांसोबत थेट कमी वेळेत संपर्क साधता येणार आहे. यामुळे केवळ रोजगाराच्या संधीचा विस्तार होणार नाही, तर वेळेची सुद्धा बचत होणार आहे.
हा सेमी बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट संपर्क साधता येणार आहे. त्यामुळे कृषी आणि इतर मालवाहू उत्पादने थेट कार्गो टर्मिनलद्वारे परदेशात पाठविली जाऊ शकतात. यामुळे अन्नधान्य वाहतुकीत सुमारे 80 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. गोदाम आणि शीतगृहाची सुविधा आवश्यकतेनुसार स्थानकांवर विकसित होणार आहे. या प्रकल्पामुळे, प्रकल्प प्रभावी क्षेत्रामध्ये जमिनीच्या दरात सुद्धा वाढ होणार आहे. रोजगाराच्या दरात वाढ झाल्याने व्यवसाय, व्यापार, शिक्षण, आरोग्यसेवा आणि इतर आवश्यक सेवांचा सर्वांगीस विकास होईल, असा दावाही महारेलच्यावतीने केला जात आहे.
महारेलने या मार्गावर नियोजित रेल्वे स्थानके प्रस्तावित आहेत. यामध्ये पुणे, हडपसर, मांजरी, कोळवाडी, वाघोली, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव भोरवाडी, आळेफाटा, बोटा, जांबुत, साकुर, अंभोरे, संगमनेर देवठाण, चास, दोढई, सिन्नर, मोहदारी, शिंदे, आणि नाशिक रोड मार्गावर ही बुलेट ट्रेन धावणार आहे. महारेलच्या वतीने राज्यात अन्य प्रकल्पही हाती घेण्यात आले असून या प्रकल्पांनाही वेग देण्यात येत आहे. नागपूर ते नागभिड या मार्गावर बुलेट ट्रेनचे काम सुरू असून 30 टक्के काम जवळपास पूर्ण झाले आहे. 83 किलोमीटर लांबीचा हा बुलेट ट्रेन मार्ग 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्धिष्ट असून यासाठी सुमारे आठ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर लातूर नांदेड या मार्गावरील बुलेट ट्रेन सुरू करण्याबाबत लवकरच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय अपेक्षित आहे.