पिंपरी (Pimpri) : हिंजवडी (Hinjawadi) ते शिवाजीनगर (Shivajinagar) मेट्रो मार्ग तीनच्या कामाला गती मिळाली आहे. त्याअंतर्गत दहा हजार ५४९ चौरस मीटरचे बॅरीकेडींग पूर्ण झाले आहे. आतापर्यंत विद्यापीठ रस्ता व हिंजवडी येथे दहा खांब उभारले आहेत. खांबांच्या ४१ कॅप्स तयार झाल्या आहेत.
पुणे मेट्रोचे स्वारगेट ते पिंपरी आणि वनाज ते रामवाडी असे दोन मार्ग आहेत. त्यांची उभारणी महामेट्रो करत आहे. हे दोन्ही मार्ग शिवाजीनगर येथे एकत्र येतात. मेट्रोचा तिसरा मार्ग शिवाजीनगर ते हिंजवडी आहे. या प्रकल्पाची उभारणी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि टाटा समूहाची स्पेशल पर्पज व्हेईकल कंपनी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयसीटीएमआरएल) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे. सुमारे २३ किलोमीटर लांबीचा हा मार्ग आहे.
या प्रकल्पाअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी काम सुरू आहे. दहा हजार ५४९ चौरस मीटरचे बॅरीकेडींगचे पूर्ण झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्ता आणि हिंजवडी येथे खांब उभारणीस सुरुवात झाली आहे. विद्यापीठ रस्त्यावर ई-स्क्वेअर समोर आणि हिंजवडीत हॉटेल विवांता समोर खांबांची बांधणी सुरू आहे. एकूण दहा खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. हा मार्ग पूर्णतः उन्नत असल्याने खांब उभारावे लागत आहेत. मेट्रो स्टेशनसाठी आतापर्यंत ४१ पाईल कॅप्स तयार आहेत. हिंजवडी येथील उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांच्या (हाय टेन्शन लाईन्स) शिफ्टींगचेही काम वेगाने सुरू आहे. सध्या सव्वाआठ किलोमीटर लाईन्सचे शिफ्टींग काम पूर्ण झाले आहे. आता फक्त शेवटचे साडेचारशे मीटर अंतर लाईन शिफ्टींगचे काम उरले आहे. उच्चदाब विद्युत वाहिन्यांचे शिफ्टींग महत्त्वाचे आहे.
आयटी हब जोडणार
पुणे मेट्रो मार्ग तीनमुळे शिवाजीनगर मध्यवर्ती केंद्राशी हिंजवडी आयटी हब जोडले जाणार आहे. खासगी भागीदारीतून (पीपीपी) प्रकल्पाची उभारणी सुरू आहे. यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, टाटा समूहाच्या ट्रिल अर्बन ट्रान्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (टीयीटीपीएल) व सिमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स यांचा समावेश आहे. हा प्रकल्प डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्स्फर (डीबीएफओटी) तत्त्वावर पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेड या विशेष उद्देश कंपनीद्वारे ३५ वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी विकसित आणि ऑपरेट केला जाणार आहे, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.
दृष्टिक्षेपात हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्ग
बॅरीकेडींग : १०,५४९ चौरस मीटर
रस्ता रुंदीकरण : ३,०४४ चौरस मीटर
उच्चदाब वाहिन्या स्थलांतर : ८.२५ किलोमीटर
पायलींग : ५९५
पाईल कॅप : ४१
व्हायाडक्ट पीअर : १०
टॉवर डिसमेंटल ः ४