मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्या (BMC) विविध प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्त रहिवाशांसाठी महापालिका एम/पूर्व चेंबूरमध्ये (Chembur) 2 हजार 68 घरे बांधून देणार आहे. त्यासाठी महापालिकेने 682 कोटींचे बजेट निश्चित केले आहे.
महापालिकेच्या माध्यमातून विकास आराखडा, सर्वसमावेशक वाहतूक योजना, पाणीपुरवठा व मलनिस्सारण प्रकल्प अशा अनेक प्रकल्पांसाठी अनेक वेळा जमिनी भारमुक्त करताना प्रकल्पबाधितांना पर्यायी घरे द्यावी लागतात. यामध्ये निवासी जागेसाठी मालमत्ता खात्याकडून तर अनिवासी बांधकामांना बाजार खात्याकडून पर्यायी जागा देण्यात येतात. सद्यस्थितीत महापालिकेने हाती घेतलेल्या विविध प्रकल्पांत सुमारे 36 हजारांवर घरांची गरज आहे, मात्र सद्यस्थितीत महापालिकेकडे उपलब्ध जागा अत्यंत कमी आहेत.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत महापालिकेने पीईपी (प्रोजेक्ट इफेक्टेड पर्सन) घरांचा तुटवडा निर्माण झाल्याने खासगी विकासकाच्या माध्यमातून जागेच्या बदली जागेचा टीडीआर (हस्तांतरित विकास अधिकार) किंवा बांधकामाच्या बदली बांधकाम टीडीआर देऊन घरे बांधण्याचे धोरण आखले आहे. यानुसार त्यामुळे चेंबूर विभागातील '600 टेनामेंट' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न.भू.क्र. 1 (भाग) आणि क्र. 3 (भाग), मौजे देवनार या ठिकाणी ही घरे बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पात 25 मजल्यांच्या सहा इमारती बांधण्यात येणार आहेत.
प्रकल्पबाधितांना पुनर्वसनात ते राहत असलेल्या ठिकाणीच घर मिळावे, अशी मागणी असते. त्यामुळे महापालिकेने सुरू केलेल्या नव्या धोरणानुसार सातही झोनमध्ये प्रत्येकी पाच हजारांवर घरे उपलब्ध होणार आहेत. शिवाय प्रदूषणाचे कारण देत माहुलमध्ये जाण्यास होणारा विरोधही टळणार असल्याने महापालिकेच्या विकास प्रकल्पांच्या अंमलबजावणीस जोर मिळणार आहे. रहिवाशांच्या विरोधामुळे रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार आहेत. महापालिकेला सद्यस्थितीत 36 हजार घरांची गरज आहे. प्रस्तावित प्रकल्पांमुळे ही गरज 50 हजारांवर जाणार आहे.