मुंबई (Mumbai) : राज्यातील सत्तांतरानंतर मुंबई महापालिका (BMC) काबीज करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कामाला लागल्याचे दिसून येते. या अनुषंगाने मुंबईचे सुशोभीकरण करण्याचा राज्य सरकारचा विचार असून, त्यावर १,७०० कोटींचा खर्च केला जाणार आहे. येत्या काळात या कामांसाठी वॉर्ड स्तरावर टेंडर (Tender) काढण्यात येणार आहेत. मुंबई महापालिका आयुक्त यात जातीने लक्ष घालणार असल्याने ही कामे दर्जेदार होणार असल्याचा दावा केला जात आहे.
अलीकडेच मुंबईच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी वाहतूक बेटं, दुभाजक, पदपथ, स्कायवॉक, समुद्र किनारे, उद्याने यांच्या सुशोभीकरणाची कामे मुंबई महापालिकेने वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका मुख्यालयात हालचाली सुरू झाल्या असून महापालिकेतील एका उपायुक्त (विशेष) दर्जाच्या अधिकार्याकडे मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. या सुशोभीकरणाची सुरुवात ऐन दिवाळीत होणार असून, प्रामुख्याने रस्ते, पदपथ, दुभाजक, बस स्टॉप, समुद्रकिनारे, गार्डनसह विविध वास्तूंचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात ऑक्टोबर महिन्यापासून होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने 500 किमीचे रस्ते व दुभाजकांचे सौंदर्यीकरण, गार्डनमध्ये लाईटिंग, उड्डाणपुलाखाली मोकळ्या जागेचे सुशोभीकरण, स्कायवॉकखाली लाईटिंग व पेंटिंग, रस्त्यावर दिवाबत्ती, लाईटिंगची रोषणाई, पदपथाचे काँक्रिटीकरण, समुद्रकिनार्यांचे सुशोभीकरण व येणार्या पर्यटकांसाठी लेझर शो, तसेच स्टार शौचालयाची उभारणी आदी कामांचा धूमधडाका सुरू होणार आहे, तर उर्वरित 50 टक्के कामाला मार्च महिन्यामध्ये सुरुवात होईल, अशी माहिती मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाचे विशेष उपायुक्त संजोग कबरे यांनी दिली.
मुंबई शहरातील ३०० किमी लांबीच्या विविध ठिकाणच्या दुभाजकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये मोकळ्या जागेत फुल झाडांची लागवड करणे, बोधचिन्हे, सिग्नल यांचा कलात्मकरित्या सजावट करणे अशी कामे पुढील तीन महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यामध्ये शहर, पश्चिम व पूर्व उपनगरातील दुभाजकांचा समावेश आहे.
पदपथांचे सुशोभीकरण करताना वर्दळीच्या ठिकाणची आणि रेल्वेस्थानकांजवळील पदापथांचे सुशोभीकरण करावे,अशी सूचना मुख्यमंत्र्यानी केली. सुमारे १७० किमी लांबीच्या पदपथांवर प्रकाश योजना व सजावट केली जाणार आहे.
पुलांखालील मोकळ्या जागेचा वापर करण्यात यावा. त्याठिकाणी स्वच्छता ठेवावी पेंटिंग करण्यात यावे, असेही शिंदे यांनी सांगितले होते. मुंबईतील २५ महत्त्वाच्या पुलांची रोषणाई केली जाणार आहे. १८ स्कायवॉकना रोषणाई केली जाणार असून, विविध आकाराचे स्ट्रीट फर्निचर देखील महत्त्वाच्या पदपथांवर बसविण्यात येणार आहेत. पुढील तीन महिन्यात ६१ वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.
जुहू, गिरगाव चौपाटी, अक्सा, वर्सोवा, दादर, माहीम, गोराई या सात समुद्र किनाऱ्यावर त्रिमितीय प्रतिमा, कलाकृती, शिल्प साकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर उद्यानांमध्ये प्रकाशित कारंजे, पदपथ करण्यात येणार आहे. उद्याने पर्यटन स्थळे बनू शकतील यासाठी ग्लो उद्यान संकल्पना राबविली जाणार आहे.
वांद्रे किल्ला, वरळी किल्ला, गेट वे ऑफ इंडिया, एशियाटिक वाचनालय, माझगाव उद्यान, अफगाण चर्च या ठिकाणी प्रकाश योजनेच्या माध्यमातून सौंदर्यीकरण केले जाणार आहे.
मुंबईत २६ ठिकाणी धारावीच्या धर्तीवर तीनमजली स्वच्छतागृह करण्यात येणार असून अत्याधुनिक बस थांबे बांधण्यात येणार आहेत.