मुंबई (Mumbai) : नवीन सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर आरे कारशेड (Aarey Carshed) संदर्भात पहिला निर्णय घेतला. मेट्रो ३ प्रकल्पासाठीची कारशेड ही आरे येथे नियोजित जागीच होणार असल्याचे कोर्टाला कळवण्याबाबतचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मेट्रो कारशेड हे आरेमधून कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. यावरून मोठा गदारोळ देखील झाला होता. (Devendra Fadnavis And Uddhav Thackeray)
राज्याच्या मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेंनी गुरुवारी शपथ घेतली. तर, देवेंद्र फडणवीसांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नवे सरकार आल्यानंतर शिंदे सरकार कामाला लागले असून त्यांनी सत्तेत आल्या आल्या 'आरे'मध्येच मेट्रो कार शेड होणार असल्याचे राज्याच्या अॅडव्होकेट जनरल यांना कळवले आहे.
आरेमध्येच मेट्रो कारशेड बांधण्यात येईल, असे निर्देश महाराष्ट्र सरकारने राज्याच्या महाधिवक्ता यांना दिले आहेत. याबाबत शासनाची बाजू न्यायालयासमोर मांडावी, अशी माहिती सूत्रांनी दिली असल्याचे वृत्त आहे. तसेच राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना पुन्हा कार्यान्वित करण्याबाबत नव्या सरकारने निर्देश दिले आहेत, अशी माहिती पुढे आली आहे.
हे दोन्ही निर्णय ठाकरे सरकारच्या काळात चांगलेच गाजले होते. मेट्रो कारशेड हे 'आरे'मधून कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. यावरून मोठा गदारोळ देखील झाला होता. 'आरे'मधील मेट्रो शेड विरोधात नागरिक देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे कारशेड कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय घेतला होता.
मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका!
दरम्यान, 'आरे'बाबतच्या या निर्णयावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खंत व्यक्त केली आहे. आरे कारशेडच्या आग्रहाने मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका, असेही ते म्हणाले.
माझ्यावरील राग माझ्या मुंबईवर काढू नका, अशी हात जोडून विनंती उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. मुंबईच्या काळजात कट्यार घुसवून नका, असेही ते म्हणाले. मी मुंबईकरांच्या वतीने विनंती करतो की, 'आरे'चा आग्रह रेटू नका. तसेच पर्यावरणाला हानी पोहचवू नका! तिकडे वन्य जीवन आहे. 'आरे'चा निर्णय बदलल्यामुळे दु:ख झाले, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली. मी पर्यावरण आणि पर्यावरणवाद्यांच्या बाजूने असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आता सरकार केंद्रात आणि राज्यातही तुमचेच आहे. त्यामुळे आमच्या सरकारच्या काळात कांजुरचा प्रस्ताव दिला होता, ही जमीन मुंबईकरांची आहे. मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका, असेही आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले. मुंबईत ८०० हेक्टरचे वनक्षेत्र निर्माण करण्याचा निर्णय आमच्या काळात झाला. त्याचवेळी 'आरे'बाबतही पर्यावरणवाद्यांच्या मागणीनेच कारशेड कांजुरला हलवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबईच्या पर्यावरणाला बाधा पोहवेल असा निर्णय रेटून नेऊ नका, असेही आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले. शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.