पुणे महापालिकेने कोविड काळात केलेल्या खर्चाचे होणार 'ऑडिट'

Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationTendernama
Published on

पुणे (Pune) : कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना एकीकडे फ्रुटी वाटप, पंख्यांपासून ते सीसीटीव्हीपर्यंत, तर दुसरीकडे जेवणापासून औषधापर्यंतच्या कामांवर कोरोना काळात कोट्यवधी रुपयांचा खर्च महापालिकेच्या विविध खात्याकडून करण्यात आला. आता या सर्व कामांचे लेखापरीक्षण (ऑडिट) होणार आहे. त्यामुळे या काळातील सर्व बिले आणि टेंडर यादी लेखापरीक्षणासाठी उपलब्ध करून देण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने सर्व खाती आणि क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.

कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर औषध उपचारापासून क्वारंटाईन सेंटर, रुग्णालयाची उभारणी, विस्थापित मजुरांसाठी कॅम्प, लॉकडाउनपासून रुग्ण व विस्थापितांची भोजन व्यवस्था, स्वॉब सेंटर्सची उभारणी, लसीकरण केंद्रांची उभारणी, स्मशानभूमीचे अद्ययावतीकरण, सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा पासून अनेक वस्तुंची खरेदी तसेच कामे करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार महापालिका आयुक्तांच्या अधिकारात करण्यात आली. त्यानुसार प्रशासनाने ६७ (३) नुसार टेंडर न मागविता ही कामे व खरेदी केली. तसेच या संदर्भातील प्रस्तावही नंतर मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवले होते. या कामांमध्ये अफरातफर झाल्याची शक्यता व्यक्त करत या कामावरून आणि त्याच्या बिलावरून नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने तेव्हा कुठला निर्णय घेतला नव्हता. मात्र आता या सगळ्या बिलांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या कामांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या सर्व कामांवर महापालिकेच्या वतीने नेमका किती खर्च झाला आहे. कुठे तो खर्च करण्यात आला आहे. खर्च करताना नियमांचे पालन झाले आहे का, असे बाबी यातून समोर येण्यास मदत होणार आहे.

क्षेत्रीय कार्यालयांना आदेश
मार्च २०१९ ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत महाराष्ट्र महापालिका अधिनियमाचे कलम ६७ (३) क अंतर्गत कोवीड निर्मुलन संदर्भात खर्ची पडलेल्या टेंडर, बिलांची लेखापरीक्षणासाठी यादी उपलब्ध करून देण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने सर्व खाती आणि क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com