औरंगाबाद (Aurangabad) : नागपूरातील कंपन्यांना ई-टेंडरिंग न करता व्यायाम शाळा साहित्याचे सुमारे नऊ कोटींचे टेंडर दिल्या प्रकरणी जिल्हा क्रिडा अधिका-यांच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय समितीने ४ ते ७ डिसेंबर २०२१ दरम्यान औरंगाबादेत तीन दिवस तळ ठोकून चौकशी केली होती. मात्र पुढे या प्रकरणावर पडदा पडल्याचे दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील व्यायाम शाळांसाठी क्रीडा विभागाकडून अनुदान देण्यात आले होते. ज्यात सन २०२० ते २०२१ या काळात व्यायाम शाळा साहित्य खरेदी करण्यासाठी सरकारकडून प्रत्येकी साडेचार कोटी रुपयांचे दोन टेंडर जाहिर करण्यात आले होते. व्यायाम शाळेसाठी ई-टेंडरव्दारे साहित्य मागविण्यात यावे अशा सूचना शासनाने दिल्या होत्या. परंतू, औरंगाबादच्या जिल्हा क्रिडा अधिकारी कविता नावंदे यांनी नागपूरच्या दोन कंपन्यांच्या नावे सुमारे नऊ कोटींचे परस्पर टेंडर काढले.
त्यानंतर ऑर्डर मिळताच कंपन्यांनी लगेचच व्यायाम शाळेचे साहित्य जिल्हा क्रिडा अधिका-यांना पाठवले. पण पुण्यातील शालेय खेळ क्रिडा बचाव समितीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शाम राजाराम भोसले यांनी याप्रकरणी २९ नोव्हेंबर २०२१ रोजी क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर जिल्हा क्रिडा अधिका-यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले. तर याप्रकरणी क्रिडा व युवक कल्याण मंत्री केदार यांच्या आदेशाने उपसंचालक उर्मिला मोराळे, पुण्याच्या शिवछत्रपती क्रिडापीठाचे उपसंचालक सुहास पाटील आणि अनिल चोरमले हे जिल्हा क्रिडा अधिकारी कविता नावंदे यांची प्रकरणासंदर्भात तीन दिवस चौकशी करण्यात आली होती.
औरंगाबाद येथील क्रीडा विभागाअंतर्गत व्यायाम शाळा साहित्य खरेदी करण्याबाबत घोटाळा झाला असून, त्यात अनियमितता असल्याची माहिती भोसले यांना मिळाली होती. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्याकडे केली होती. त्यानंतर केदार यांच्या आदेशाने चौकशी सुरू करण्यात आली होती.