मुंबई (Mumbai) : उद्योग क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर असून, उद्योजकांचा राज्यावरील विश्वास आणि आपली पत वाढून महाराष्ट्राची उद्योगस्नेही ही ओळख पुन्हा प्रस्थापित झाली आहे. राज्य सरकारने विकासाचा अटलसेतू पार केला असून, समृद्धीच्या महामार्गाने, एक्सप्रेस वे वरून बुलेट ट्रेनच्या वेगाने विकास करीत राज्य सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले.
विधानसभेत नियम 293 अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. गेल्या दोन वर्षांत दावोसमध्ये पाच लाख कोटींच्या परदेशी गुंतवणुकीचे करार झाले आहेत. गेल्यावर्षीच्या करारांपैकी 80 टक्के करारांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यातून सुमारे तीन ते साडेतीन लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. पूरक उद्योगांमुळे आणखी काही लाख लोकांना रोजगार मिळेल. देशातला पहिला ग्रीन हायड्रोजनचा प्रकल्प महाराष्ट्रात येतोय. राज्याला एक ट्रीलियन डॉलर्स इकॉनॉमी बनविण्याचा निर्धार असून, तो आम्ही नक्की पूर्ण करू, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्य सरकारने 121 सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली असून सुमारे 99 हजार 103 कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून सुमारे 15 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येणार आहे. वैनगंगा-नळगंगा सर्वेक्षण सुरू असून पैनगंगाचा डीपीआर तयार आहे. लवकरच ही कामे सुरु होतील. वशिष्ठीमधून समुद्रात वाहून जाणारे पाणी मध्यम बंधारे बांधून कोकणात वळविण्यात येत आहे. मराठवाडा वॉटरग्रीडलाही चालना देण्यात येत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध शासकीय-निमशासकीय विभागांमध्ये 75 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र प्रत्यक्ष निर्णयाची अंमलबजावणी करताना 75 हजारांच्या तीनपट म्हणजे एक लाख 61 हजार 841 पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत शासकीय-निमशासकीय विभागांमध्ये 45 हजार 152 पदांवर नियुक्तीचे आदेश दिले आहेत. सहा हजार पदांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच त्यांना नियुक्त्या देण्यात येणार आहेत, हे सरकारचे मोठे यश असल्याचे त्यांनी सांगितले.
अनुकंपा तत्त्वावर सुमारे तीन हजार 334 उमेदवारांना नियुक्त्या दिल्या आहेत. राज्यभर आता नमो महारोजगार मेळावे सुरू आहेत. नागपूर, लातूर, अहमदनगर मेळाव्यात 20 हजार पेक्षा जास्त तरुणांना रोजगार मिळाले आहेत. पुढे अजून बारामती, ठाणे येथे महारोजगार मेळावे याच आठवड्यात होणार असून सरकार आपल्या दारी अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंत सव्वा तीन कोटी लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असल्याची माहिती शिंदेंनी दिली.
गेल्या पावणेदोन वर्षांत आपला महाराष्ट्र सर्वंच क्षेत्रात नंबर वन आहे. एक लाख कोटीपेक्षा अधिक विदेशी थेट गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकवर आहे. आठ लाख कोटी रुपयांची कामे राज्यात सुरू आहेत. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या कामातही महाराष्ट्र नंबर वन आहे. इन्कम टॅक्स, जीएसटी आणि जीएसडीपी मध्येही महाराष्ट्र नंबर वन आहे. निर्यातीमध्ये, स्टार्टअपमध्येही महाराष्ट्र नंबर वन आहे. देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी सेतू आपण उभारला तिथेही महाराष्ट्र नंबर वन आहे. मुंबई पुणे मिसिंग लिंकचा टनेल उभारण्यातही आपला महाराष्ट्र नंबर वनच आहे. स्वच्छतेत देखील महाराष्ट्र नंबर बनला आहे, असा दावा शिंदे यांनी केला.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महाराष्ट्र महामार्गाचा तिसरा टप्पा आता सुरू करत आहोत. भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा समृद्धी महामार्ग आता लवकरच खुला होत आहे. समृद्धी महामार्ग गडचिरोली, भंडारा, गोंदियापर्यंत वाढविण्यात येणार आहे. मुंबई कोस्टल रोड, मेट्रो तीन, पुणे मेट्रो, मुंबई-पुणे मिसिंग लिंकचे लवकरच लोकार्पण होणार आहे. नागपूर-गोवा दरम्यान शक्तीपीठ महामार्ग, कोकण कोस्टल रोड, कोकण एक्सप्रेस वे, महाराष्ट्रात सात हजार किमी लांबीच्या रस्त्यांचे ग्रीड केले जात आहे. त्यामुळे चांदा ते बांदा जोडले जाणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मुंबईकरांना मालमत्ता करात 736 कोटी रुपयांची सवलत मिळाली आहे. अनेक वर्षे रखडलेल्या एसटीपी प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावला आहे. मुंबईच्या महापालिका रुग्णालयांमध्ये झिरो प्रिस्क्रिप्शन सुविधा सुरू करण्यात आली आहे. लंडन, न्यूयॉर्कच्या धर्तीवर रेसकोर्सची 120 आणि कोस्टलची सुमारे 200 अशा एकूण 320 एकर जागेवर सेंट्रल पार्क उभारले जाणार आहे. यामुळे मुंबईकरांना शुद्ध हवा आणि मनोरंजनासाठी हक्कासाठी जागा मिळेल.
राज्यातील एसटी बस स्थानकांचा मेकओव्हर करण्यात येत आहे. मुंबईच्या विकासात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या गिरणी कामगारांना हक्काची घरे दिली जात आहेत. धारावीकरांना स्वतःचे हक्काचे अधिकृत घर मिळणार आहे. मुंबईतील जुन्या इमारती आणि झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास सुरू केला आहे. म्हाडा, सिडको, एमएमआरडीए, बीएमसी, महाप्रितच्या माध्यमातून पुनर्विकासाचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.