मुंबई (Mumbai) : दादरच्या (Dadar) इंदू मिल (Indu Mill) येथे उभारण्यात येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबडेकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या स्मारकाच्या कामाला विलंब झाल्याने दहा वर्षापूर्वी सव्वाचारशे कोटींवर असलेला खर्च आता एक हजार कोटींवर पोहोचला आहे.
डॉ. आंबडेकर यांच्या स्मारकाचे काम 2024 मध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठेवले आहे. या स्मारकाच्या बांधकामाचे काम वेगाने सुरु असून येथील स्मारकाच्या सहायक इमारतीचे 49 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर पादचारी मार्गाचे काम 6 टक्के झाले असून इतर कामे प्रगतीपथावर आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी राज्य सरकारने मार्च 2013 मध्ये विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएची नियुक्ती केली आहे. प्रथम स्मारकातील पुतळ्याची उंची 250 फूट निश्चित करण्यात आली होती. मात्र नंतर आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची 350 फूट आणि चबुतरा 100 फूट असे एकूण 450 फूट उंची निश्चित केली आहे. या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2015 मध्ये करण्यात आले होते.
आंबेडकर स्मारकाच्या संपूर्ण प्रकल्पासाठी 2012 मध्ये 425 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. हा खर्च 2017 मध्ये 709 कोटींवर गेला आहे. स्मारकाच्या कामाला विलंब झाल्याने आता हा खर्च 1 हजार कोटींवर पोहचला आहे. नुकतीच एमएमआरडीएने या प्रकल्पासाठी 1 हजार कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. या स्मारकाचे काम 2024 मध्ये पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे लक्ष्य आहे. स्मारकाच्या सहायक इमारतीचे 49 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर पादचारी मार्गाचे काम 6 टक्के झाले असल्याची माहिती एमएमआरडीएने स्मारकाच्या कामासाठी पाठपुरावा करणारे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत भंडारे यांना कळविले आहे.