मुंबई (Mumbai) : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माथेरान (Matheran) या थंड हवेच्या ठिकाणी मध्य रेल्वेच्या अमन लॉज ते माथेरान (Aman Lodge to Matheran) अशा मिनी ट्रेनच्या शटल सेवेने एप्रिल 2021- मार्च 2022 या आर्थिक वर्षात सुमारे तीन लाखांहून अधिक प्रवाशांची वाहतूक करीत 1.82 कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे माथेरानची मिनी ट्रेन माथेरानच्या पर्यटनाला मोठी चालना देत आहे.
माथेरान हे मुंबईतील नागरिकांसाठी सर्वात जवळचे हिल स्टेशन आहे. मध्य रेल्वेने 2021-2022 (एप्रिल ते मार्च दरम्यान) 3,06,763 प्रवाशांची वाहतूक केली असून अमन लॉज ते माथेरान दरम्यान आठवड्याच्या दिवशी एकूण 16 फेर्या आणि वीकेंडला 20 फेर्यांच्या मदतीने 42,613 पार्सल पॅकेजेसची वाहतूक केली आहे. यामुळे एप्रिल-2021 ते मार्च-2022 या कालावधीत 1.82 कोटी रुपये महसूल मिळाला आहे. यामध्ये 1.78 कोटी रु.प्रवाशांच्या वाहतूकीतून आणि 3.29 लाख रूपये पार्सल वाहतूकीतून मिळाले आहे.
माथेरानला जाणार्या प्रवाशांसाठी हिवाळी सुट्टीचा नोव्हेंबर हा सर्वात योग्य महिना असतो. नोव्हेंबर-2021 मध्ये 42,021 प्रवाशांची वाहतूक करीत 27.65 लाख रूपयांची कमाई केली. तर डिसेंबर महिन्यात 43,500 प्रवाशांची वाहतूक करीत 27.11लाख रूपयांची कमाई केली असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.