नागपूर (Nagpur) : हिवाळी अधिवेशन म्हणजे अधिकारी आणि ठेकेदारांसाठी कमाईची पर्वणची असते. याची प्रचीती पुन्हा आली आहे. यावेळच्या अधिवेशनासाठी तब्बल एक कोटींची कामे तुकडे पाडून सोसायट्यांना देण्यात आले आहेत. सर्व कामे आमदार निवास, रविभवन तसेच सरकारी इमारतींच्या रंगरंगोटीची आहेत.
सध्या हिवाळी अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे. १९ डिसेंबरपासून अधिवेशनाला सुरुवात होत असल्याने मंत्री व आमदारांच्या बंगल्यांसह शासकीय इमारतींची डागडुजी केली जात आहे. या अधिवेशनाचा खर्चाचा अंदाज ९५ कोटी रुपये काढण्यात आला आहे. टेंडर प्रक्रिया केल्यास बिल निविदा सादर करणाऱ्यांना कामे दिली जातात. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची अडचण होते. त्यामुळे छोटी कामे टेंडर न काढताच करण्यात आली. रंगरंगोटीची कामांचे अनेक तुकडे करण्यात आले. प्रत्येकी १० लाख रुपयांची कामे सोसायट्यांना वाटप करण्यात आली. टेंडर काढण्यात आले नसल्याने बिलोचा प्रश्नच उद्भवला नाही. त्यामुळे शासनाचेही नुकसान झाले आहे. डेंटर काढले असते तर स्पर्धा झाली असती. इतर कामांसाठी सरासरी ३० टक्के कमी दराच्या निविदा सादर झाल्या आहेत. मात्र रंगरंगोटीच्या कामात अधिकाऱ्यांना कुठलीही तडजोड करायची नाही असे दिसून येते.
आमदार निविसाच्या तीन इमारती आहेत. रंगरंगोटीचे काम एकत्रित केले असते तर टेंडर काढावे लागले असते. त्यामुळे तीन इमारतींच्या कामाचे तुकडे करण्यात आले. वेगवेगळ्या सोसायट्यांना कामे वाटप करण्यात आली आहेत. कामाचे तुकडे पाडताना ९ लाखांच्या वर एक काम जाणार नाही याचीही दक्षता घेण्यात आली आहे. रविभवन येथे मंत्री तर नागभवन येथे राज्यामंत्र्यांचा मुक्काम असतो. देवगिरी आणि रामगिरीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री थांबतात. सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या कॉटेजवर विशेष बडदास्त ठेवली जाते. आपला मंत्री नाराज होणार नाही आणि त्याल्या कुठलीही कमतरता जाणावणार नाही अशा सर्व सोयी अधिवेशनाच्या काळात केल्या जातात. छगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्या कॉटेजवर फाईव्ह स्टार हॉटेल प्रमाणे सुविधा दिल्या जात होत्या.