मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) सुमारे 12 हजार 721 कोटींचा खर्च करीत असलेल्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडचे 55.22 टक्के काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे, अरबी समुद्राच्या महाकाय लाटा आणि भरतीपासून कोस्टल रोडचे संरक्षण करण्यासाठी बांधल्या जात असलेल्या आर्मर आणि कोअर वॉल या दोन स्तरावरील संरक्षण भिंतीचे कामही 73 टक्के पूर्ण झाले आहे.
मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून प्रियदर्शनी पार्क ते वरळी सी-लिंक दरम्यान 10.58 किमीचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. प्रकल्पातील पहिल्या बोगद्याचे काम गेल्या वर्षी 11 जानेवारी रोजी मुख्यमंत्र्याच्या प्रमुख उपस्थितीत सुरु झाल्यानंतर वर्ष पूर्ण व्हायच्या एक दिवस आधीच हा बोगदा खणून पूर्ण झाला आहे. पहिल्या 2 किमी बोगद्याचे काम पूर्ण होऊन त्यातील एक किलोमीटरवर परिसर हा वापरासाठी योग्य झाला आहे तर दुसऱ्या बोगद्याचे कामही जोरात सुरु असून आतापर्यंत 450 मीटरचे काम पूर्ण झाले आहे. पुढील सहा महिन्यांत दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण होणार असून प्रकल्प डिसेंबर 2023 ला मुंबईकरांच्या सेवेत येईल, असे महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे.
मुंबईची वाहतूककोंडीतून सुटका करणाऱ्या या पर्यावरणपूरक प्रकल्पाचे काम पावसाळ्यातही नेहमीच्या गतीने सुरु राहणार असून अरबी समुद्राच्या महाकाय लाटा आणि भरतीपासून कोस्टल रोडचे संरक्षण करण्यासाठी बांधल्या जात असलेल्या आर्मर आणि कोअर वॉल या दोन स्तरावरील संरक्षण भिंतीचे काम 73 टक्के पूर्ण झाले आहे.
मुंबई अतिवृष्टी झाली तर मुंबईतून कोस्टल रोडच्या दिशेने येणाऱ्या गटारांची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढावी, यासाठी आयताकृती (बॉक्स) आणि गोलाकार गटारे (कल्व्हर्ट) अशी गटारे बांधण्यात आली असून ती मुंबईतून कोस्टल रोडच्या दिशेने येणाऱ्या गटारांशी जोडली आहेत. त्यामुळे गटारांच्या क्षमतेत दुपटीने वाढ झाली आहे. या गटारांच्या तोंडाशी नव्याने स्वयंचलित आणि स्वहस्ते वापरता येतील असे फ्लडगेट बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे भरतीपासून कोणत्याही प्रकारचा धोका कोस्टल रोडला होणार नाही.
देशातील हा पहिलाच प्रयोग असून बोगद्यांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी वायुविजनाची 'सकार्डो यंत्रणा' वापरली जाणार आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत महापालिका नियंत्रण कक्ष, पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाला तत्काळ मेसेज जाऊन मदत घेता येणार आहे. अतिवृष्टीमुळे पाणी साचले तर पाणी उपशासाठी पंप तैनात ठेवण्यात आले आहेत. कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला 2018 मध्ये सुरुवात झाली. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सध्या 4 हजार 500 कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. यामध्ये बोगद्याच्या कामासाठी तब्बल 250 कामगार काम करीत आहेत. महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोस्टल रोडचे काम वेगाने सुरु आहे.