नागपूर (Nagpur) : आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाच्या टेंडरचा पाऊस पडला असल्याचे सांगत सर्व टेंडर सगेसोयऱ्यांच्या घरी, जनतेने फिरावे दारोदारी अशी बोचरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. आमच्यावर टीका करताना एका मर्यादेपर्यंत टीका करावी असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
विधिमंडळ अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळावर टीका करताना शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता घोटाळ्यांची यादीच मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, कोरोनाच्या काळात भीतीच्या वातावरणात लोक जगत असताना पैसे लुटण्याचा प्रकार सुरू होता. कफनचोर, खिचडी चोर ही बिरुद देखील कमी पडतील असा भ्रष्टाचार झाला. ऑक्सिजन प्लांटमध्ये ही भ्रष्टाचार झाला. काही लोकांच्या कृपेने उत्तर प्रदेशातील महामार्ग कंस्ट्रक्शन कंपनीला कामे दिली. आदित्य राजाच्या कृपेने वरुन राजाच्या टेंडरचा पाऊस पडला असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर तुफान टीका करताना म्हटले की, रोमिन छेडा हा त्याचा प्यादा आहे. सुरुवात मुंबईतील वीर जिजामाता उद्यानातील पेंग्विन कक्षापासून झाली. हायवे बांधणाऱ्या कंपनीला पेंग्विन कक्षाचे काम दिले. पेंग्विन पाठोपाठ ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे कामही देण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. एकही मालिक आणि सब का मालिक एक असल्याचे ते म्हणाले. अनेकदा एक एक महिन्याचे काम दाखवून सातत्याने काम देण्यात आले. या कंपनीला नंतर महापालिका शाळांत वॉटर प्युरिफायर पुरवण्याचे काम दिले. त्याशिवाय फिल्टर पंप आणि अनेक कामे देण्यात आली. याच कंपनीला जुहू रुग्णालयात हाऊस कीपिंगचे काम देण्यात आले. मुंबईतील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात काम देण्यात आले. हे कमी की काय महापालिका रुग्णालयात एसीशी संबंधित काम देण्यात आले. ही कंपनी काय काय करते याची जंत्री फार मोठी आहे. माझे डोके गरगरायला लागले असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना लगावला. रोज तुम्ही आमच्यावर आरोप करणार, रोज शिव्या घालणार. पण, आता हे सगळे पुराव्यानिशी सगळे बाहेर येणार असल्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. जिथे टेंडर तिथे सरेंडर असा प्रवास सुरू असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली.
रस्ते बनवणाऱ्या कंपनीला कंत्राटे देत या लोकांनी आरोग्य व्यवस्थेला रस्त्यावर आणले असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सर्व टेंडर सगेसोयऱ्यांच्या घरी, जनतेने फिरावे दारोदारी असेही त्यांनी म्हटले. सुजित पाटकर यांच्या कंपनीद्वारे बोगस रुग्ण व औषध दाखवण्यात आली. महापालिका तिजोरीवर दरोडा घालण्याचे काम केले आहे. या सगळ्याबाबतची माहिती घेतली आहे. या लुटलेल्या दौलतीमधून कुणी घरे भरली असा सवाल करताना आरोप करताना विचार करा, नाहीतर याहून अधिक पोतडीत असल्याचा सूचक इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. 300 ग्रॅम ऐवजी 100 ग्रॅम खिचडी दिली. गोरगरिबांच्या तोंडातील 200 ग्रॅम खिचडीचा घास हिरावून स्वतःची तुंबडी भरली. कुणाच्या खात्यात किती पैसे हे उघड झाले आहे, ते बाहेर येईल असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले. सह्याद्री रिफ्रेशमेंट हे कदम व पाटकर यांच्याशी संबंधित आहे. पात्रतेसाठी दाखवलेले किचन हे पर्शियन दरबार हॉटेलच्या मालकाचे होते. त्या मालकाला माहितच नव्हते की आपले किचन खिचडीसाठी दाखवले आहे. त्यांनी प्रतिज्ञापत्र दिले आहे. अरेबियन नाईट्ससह पर्शियन नाईट्सच्या सुरस कथा पुढे आल्या आहेत असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले. आरोग्य व्यवस्था रस्त्यावर असताना घरी बसणाऱ्यांनी देशात एक नंबरचा सीएम आहे हे दाखवू नये घरात बसून एक नंबर कसे होतात असा सवाल करताना तो नंबर पुढून नाही, तर शेवटून होता अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.