Navi Mumbai Metro : अखेर मेट्रोची सेवा सुरु; दर 15 मिनिटांनी धावणार; इतके तिकीट...

Navi Mumbai Metro
Navi Mumbai MetroTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : नवी मुंबई मेट्रो सज्ज होऊन नोव्हेंबरमध्ये 5 महिने होत आहेत. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मिळत नसल्याने लोकार्पण रखडले होते. एकाच महिन्यात पंतप्रधानांच्या चार वेळा तारखा जाहीर करून सुद्धा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. यावरून चौफेर टीका होऊ लागल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकार्पण सोहळा न करता मेट्रो प्रवासी सेवेचा प्रारंभ करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आज १७ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजता पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंधर मेट्रो सेवा सुरू होणार आहे. यामुळे नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

Navi Mumbai Metro
Bullet Train : देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे सारथ्य कोण करणार?

सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईमधील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीकोनातून नवी मुंबई मेट्रो प्रकल्प साकारण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण ४ उन्नत मार्ग विकसित करण्यात येत असून सिडकोतर्फे प्रथम बेलापूर ते पेंधर या ११.१० किमी लांबीच्या मार्ग क्र. १ चे काम हाती घेण्यात आले होते. या मार्गावर एकूण ११ स्थानकांसह तळोजा पंचनंद येथे आगार (डेपो) आहे.  मार्ग क्र. १ ची अंमलबजावणी करण्याकरिता अभियांत्रिकी सहाय्य म्हणून सिडकोतर्फे महा मेट्रोची नियुक्ती करण्यात आली होती. मार्ग क्र. १ वर धावणाऱ्या मेट्रोच्या ऑसिलेशन, विद्युत सुरक्षा, ईमर्जन्सी ब्रेक इ. चाचण्या यशस्वीरीत्या पार पाडण्यात आल्या व त्याबाबतचे प्रमाणपत्रही संबंधित यंत्रणांकडून प्राप्त झाले. तद्नंतर मेट्रोच्या वाणिज्यिक परिचालनाकरिता (commercial operation) सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेली सीएमआरएस (मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त) यांच्यातर्फे करण्यात आलेली चाचणीदेखील यशस्वीरीत्या पार पडून मार्ग क्र. १ वर प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता सीएमआरएस यांचे प्रमाणपत्रही प्राप्त झाले असून १७ नोव्हेंबर २०२३ पासून सदर मार्गावर मेट्रो सेवा सुरू होणार आहे.

Navi Mumbai Metro
Mumbai Metro : मुंबई मेट्रोच्या विस्ताराची घोषणा; काय म्हणाल्या अश्विनी भिडे?

अत्याधुनिक रचनेचे वातानुकूलित डबे, मेट्रो स्थानकांच्या दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन (एन्ट्री) आणि  निर्गमनाची (एक्झिट) व्यवस्था आहे. मेट्रो स्थानकांवर  पार्किंगसाठी जागा, दिव्यांग प्रवाशांकरिता रॅम्प, पदपथ (फुटपाथ), ऑटो रिक्षांकरिता जागा, अखंड वीज पुरवठ्यासाठी यूपीएससह डिझेल जनरेटरची (डीजी) व्यवस्था, कॉनकोर्स आणि फलाटांवर प्रवासी घोषणा प्रणाली, सीसीटीव्ही, दिव्यांग व्यक्तींसाठी कॉनकोर्स स्तरावर विशेष स्वच्छता गृहांची व्यवस्था, कॉनकोर्स परिसरात व्यावसायिक वापराच्या दृष्टीने दुकानांकरिता जागा, ही नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. सर्व नवी मुंबईकरांनी आपल्या दैनंदिन वापरासाठी नवी मुंबई मेट्रोच्या या वातानुकूलित, आरामदायी व निसर्गरम्य प्रवासाचा अनुभव घेऊन परवडणाऱ्या दरात सुखकर प्रवास करावा असे सिडकोतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

Navi Mumbai Metro
Mumbai : 'या' ठिकाणी नवीन प्रवासी जेटीसाठी 162 कोटींची योजना

“ नवी मुंबई मेट्रो सेवेला प्रारंभ होत आहे, याबद्दल सिडकोचे अभिनंदन आणि नवी मुंबईकरांना शुभेच्छा. मेट्रोद्वारे नवी मुंबई अंतर्गत उत्तम कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशामध्ये मेट्रो मार्गांचे जाळे निर्माण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून नवी मुंबईमध्ये सिडकोतर्फे मेट्रोच्या अंमलबजाणीचे काम प्रभावीपणे सुरू आहे” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

“मेट्रोच्या रूपाने नवी मुंबईकरांना जलद, पर्यावरणपूरक आणि आरामदायी परिवहनाचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार असून सीबीडी बेलापूरसह वेगाने विकसित होत असलेल्या खारघर, तळोजा नोड्सना मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभणार आहे. नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय शहर या लौकिकाला साजेशी उत्तम आणि सक्षम परिवहन व्यवस्था मेट्रोद्वारे निर्माण होणार आहे.” अशी प्रतिक्रिया सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी दिली आहे.

दर १५ मिनिटांनी धावणार मेट्रो:
ही मेट्रो सेवा १७ नोव्हेंबर २०२३ रोजी पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंधर दरम्यान दुपारी ३.०० वाजता सुरू होऊन शेवटची फेरी ही रात्री १०.०० वाजता असणार आहे. तर १८ नोव्हेंबर २०२३ पासून पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंधर दरम्यान सकाळी ०६.०० वाजता पहिली मेट्रो धावणार असून दोन्ही बाजूंकडून मेट्रोची शेवटची फेरी ही रात्री १०.०० वाजता होणार आहे. हा मार्ग क्र. १ वर दर १५ मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावणार आहे. काही तांत्रिक कारणामुळे सदर मेट्रो मार्गावरील आरबीआय कॉलनी, स्थानक क्र. २ वर काही दिवस मेट्रो थांबणार नाही याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी.

नवी मुंबई मेट्रोचे तिकीट दर किती?
या मार्गावर धावणाऱ्या मेट्रोच्या तिकीटाचे दर हे अंतरानुसार पुढीलप्रमाणे असणार आहेत – ० ते २ किमीच्या टप्प्याकरिता रु. १०, २ ते ४ किमीकरिता रु. १५, ४ ते ६ किमीकरिता रु. २०, ६ ते ८ किमीकरिता रु. २५, ८ ते १० किमीकरिता रु. ३० आणि १० किमीपुढील अंतराकरिता रु. ४० असणार आहे.  

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com