कोल्हापूर (Kolhapur) : टेंडर (Tender) प्रक्रिया न राबविता घोटवडे (ता. राधानगरी) येथील राधानगरी कंपनीला पशुखाद्य वाहतूकीचा परवानगी दिल्याचा आरोप कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या संचालिका शौमिका अमल महाडिक यांनी केला आहे. तर, संघाच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यातून प्रतिदन 500 टन पशुखाद्य तयार होते. दूध उत्पादकांना वेळेत पशूखाद्य पुरवठा व्हावा यासाठी संचालकांनी अत्यावश्यक सेवा म्हणून वितरण व्यवस्थापकांच्या मागणीनूसार 25 भाडोत्री वाहनांचा पुरवठा केल्याचा खुलासा गोकुळ संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केला आहे. त्यामुळे वर्षाला अडीच हजार कोटीहून अधिक रुपयांची उलाढाल असलेल्या गोकुळ संघाचे वाहतुकीचे टेंडर देण्यावरून संचालकांमधील वातावरण कलुषित झाले आहे.
संचालिका महाडिक म्हणाल्या, महालक्ष्मी पशुखाद्य विक्रीचे जुन-जूलै महिन्यात पहिले टेंडर निघाले होते. त्यानुसार ज्याने कमी दर भरणाऱ्याला हे डेंटर मिळाले. त्यानूसार दहा हजार टन पशुखाद्याची मागणी होती आणि पन्नास गाड्यांची मागणी होती. पण, या पन्नास गाड्या व्यतिरिक्त आणखी 25 वाहने अनाधिकृतपणे पशुखाद्य भरण्यासाठी उभ्या केल्या आहेत. त्या उद्या हे पशुखाद्य वाहतूक करणार आहेत. कोणत्याही प्रकारचे टेंडर काढलेले नाही. अध्यक्ष सांगतात त्या बोर्ड मिटिंगमध्ये आपणही होतो. पण, याबद्दल कोणतीही चर्चा किंवा ठराव झालेली नाही. फाईव्ह स्टार एमआयडीसीमध्ये जाऊन सर्व माहिती घेतली. कार्यकारी संचालकांकडे माहिती मागितली पण ती दिली नाही. गोकुळ अध्यक्षांनीही दुसऱ्या दिवशी माहिती दिली जाईल म्हणून सांगितले. पण दिली नाही, दरम्यान, हा ठेका घोटवडे (ता. राधानगरी) येथील राधानगरी कंपनीला बेकायदेशीर दिला आहे, असाही आरोप महाडिक यांनी केला.
गोकुळ अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, पशुखाद्य विक्रीसाठी काढण्यात आलेल्या टेंडरधारकाकडून अपेक्षा व वेळेत सेवा दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत पशुखाद्य मिळत नाही, अशा तक्रारी वाढल्या आहेत. यासाठी गोकुळच्या वितरण विभागाकडून जादा वाहनांची मागणी करण्यात आली. पूर्वीचा वाहतूक टेंडरधारकाकडून वेळेत पशुखाद्य पूरवठा होत नसल्याने त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शेतकरी आणि गोकुळचे हित जपण्यासाठी पूर्वी आलेल्या दरानूसार तातडीची सेवा म्हणून इतर वाहतूकदाराला 25 वाहनांची मंजूरी दिली आहे. यामध्ये शेतकरी आणि गोकुळचा फायदा आहे. गोकुळला यामुळे एका पैशाचाही तोटा झालेला नाही. त्यामुळे टिका करणाऱ्यांनी उत्पादकांची दिशाभूल करू नये, असेही पाटील यांनी नमूद केले आहे.