मुंबई (Mumbai) : नवी मुंबईत (Navi Mumbai) मोक्याच्या ठिकाणी असलेल्या सिडकोच्या (CIDCO) घरांसाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर सोडत निघणार आहे. वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरुळ आणि खांदेश्वर येथील सुमारे ४० हजार घरांचा समावेश यात आहे.
नवी मुंबईत अगदी मोक्याच्या ठिकाणी अर्थात रेल्वे स्थानकांबाहेर ही घरे आहेत. कोणत्या मजल्यावर घर हवे हा पर्याय निवडण्याची मुभाही या सोडतीमध्ये देण्यात येणार आहे.
सिडकोच्यावतीने यंदा निघणारी ही सोडत मोठी आहे. अनेक वर्षांपासून सोडतीमध्ये घर लागण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना येथे संधी मिळू शकते, अशी शक्यता आहे. रेल्वे स्थानकानजीक असणाऱ्या घरांसोबतच उद्याने, बाजार, रुग्णालये आणि इतरही सुविधा हाकेच्या अंतरावर असल्यामुळे या सोडतीची सर्वांना प्रतीक्षा आहे.
सिडकोच्या या सोडतीमध्ये उपलब्ध असणाऱ्या घरांच्या किमती नेमक्या किती असतील किंवा ही घरे किती मोठी असतील यासंदर्भातील माहिती अद्यापही गुलदस्त्यातच आहे. पण या सोडतीसाठी मिळणारा प्रतिसाद तुलनेने जास्तच असेल, असा अंदाज आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या सोडतीसाठी अनामत रकमेपासून कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याची तयारी सुद्धा सुरू झाली आहे.