नाशिक (Nashik) : नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे २०२७-२८ या वर्षी होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक असलेल्या कामांचे आराखडे तयार करून ते मंजुरीसाठी राज्य शासनाने जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय संनियंत्रण समिती कार्यान्वीन करण्यात यावी, अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे. दरम्यान नाशिकचे पालकमंत्री शिवसेनेचे दादा भुसे असताना राष्ट्रवादीचे भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून अप्रत्यक्षरित्या भुसे यांच्या कामातील उणीव लक्षात आणून दिल्याचे मानले जात आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे २०२७-२८ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. सिंहस्थ कुंभमेळा आता साडेतीन वर्षांवर येऊन ठेपला असून नाशिक महापालिका वगळता जिल्हा यंत्रणेच्या पातळीवर सिंहस्थपूर्व कामांबाबत कोणतीही हालचाल सुरू असल्याचे दिसत नाही. नाशिक महापालिकेने सिंहस्थासाठी अकारा हजार कोटी रुपयांचा प्रारुप आराखडा तयार केला आहे. मात्र, या आराखड्यात मान्यता देण्यासाठी जिल्हास्तरीय सिंहस्थ संनियंत्रण समितीची स्थापना केलेली नाही. यामुळे या आराखड्यास मान्यता मिळणार नाही.
नाशिकप्रमाणेच त्र्यंबकेश्वर येथेही सिंहस्थ कुंभमेळा भरत असतो. सिंहस्थात सहभागी होत असलेल्या १३ आखाड्यांपैकी १० आखाडे त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थ येथे शाहीस्नान करतात. त्याचप्रमाणे नाशिक-त्र्यंबकेश्वरचा सिंहस्थ पावसाळ्यात येत असल्याने व त्र्यंबकेश्वर येथे पावसाचे प्रमाण अधिक असल्याने त्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाला पुरेसा वेळ मिळणे अपेक्षित असताना यावेळी जिल्हा प्रशासनाच्या व राज्य सरकारच्या पातळीवर सिंहस्थांबाबत कोणतीही हालचाल सुरू असल्याचे दिसत नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयातून कोणत्याही सूचना गेलेल्या नसल्याने त्र्यंबकेश्वर नगरपालिकेनेही सिंहस्थाच्या दृष्टीने अद्याप नियोजन सुरू केले नाही. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाने मागील महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कक्ष सुरू करण्यास परवानगी मागणारे पत्र राज्य सरकारला पाठवले. मात्र, त्यांना अद्याप उत्तर आले नाही.
या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर मध्ये सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या तीन वर्षांवर ठेपला असल्याने आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आतापासून तयारी केली तरच कुंभमेळ्यापर्यंत ही कामे पूर्ण होतील. त्यासाठी नाशिक शहराच्या पायाभूत सुविधांकरिता नाशिक महानगरपालिकेने आणि त्र्यंबकेश्वरमधील सुविधांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने सिंहस्थामधील कामांचे सूक्ष्म नियोजन करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची आवश्यकता असल्याचे मंत्री भुजबळ यांनी पत्रात नमूद केले आहे.
सिंहस्थ आराखड्यातील विविध कामांसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून निधी प्राप्त होत असतो. सिंहस्थ कुंभमेळ्यातील सर्वाधिक महत्वाचा प्रश्न साधुग्राम आणि अन्य विकास कामांसाठी भूसंपादनाचा असतो. यासाठी आतापासून नियोजन केले तरच भूसंपादन करून त्या ठिकाणी कामे करता येतील. सिंहस्थ तोंडावर आल्यानंतर घाईघाईत कामे केली तर त्या कामांना दर्जा राहत नाही.
विकासकामे दर्जेदार आणि दिर्घकालीन होण्यासाठी ती विशिष्ट कालमर्यादेत होणे आवश्यक आहे. तसेच सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने लवकरात लवकर जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय संनियंत्रण समिती कार्यान्वीत करून राज्य व केंद्रशासनाकडून निधी मिळण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील कामांबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची कार्यवाही व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.