मुंबई (Mumbai) : केंद्र सरकारने नफ्यात चालणारी सरकारी मालकीची बंदरे, प्रकल्प, विविध कंपन्यांचे खासगीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. आता जेएनपीएच्या (JNPA) मालकीच्या एकमेव कंटेनर टर्मिनलचेही अखेर खासगीकरण झाले आहे. हे जागतिक टेंडर जे. एम. बक्सी पोर्ट अँड लॉजिस्टिक्स प्रा. लि. मुंबई या कंपनीला मिळाले आहे. या कंपनीने एका २० फुटी कंटेनरच्या रॉयल्टीपोटी सर्वाधिक ४,२९३ रुपये दर देण्याची तयारी दर्शवली आहे. गेल्या ३३ वर्षात जेएनपीए बंदरातील कंटेनर टर्मिनल पहिल्यांदाच एका भारतीय कंपनीच्या ताब्यात आले आहे. (JNPT Terminal Tender)
याआधीच जेएनपीएने स्वमालकीची चारही बंदरे बहुराष्ट्रीय कंपन्यांना खासगीकरणातून चालविण्यासाठी दिली आहेत. त्यानंतर जेएनपीएच्या मालकीच्या एकमेव उरलेल्या ६८० मीटर लांबीच्या कंटेनर टर्मिनलचे पब्लिक, प्रायव्हेट, पार्टनरशिप (पीपीपी) तत्त्वावर खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. खासगीकरणाला कामगारांनी जोरदार विरोध केला होता तो डावलून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारने या बंदराच्या खासगीकरणासाठी थेट जागतिक स्तरावर टेंडर काढले होते. १२ पैकी ११ कंपन्यांची टेंडर पात्र ठरली होती. पात्र ठरलेल्या ११ कंपन्यांच्या टेंडरना तांत्रिक बीटसाठी मंजुरीही देण्यात आली होती. त्यानंतर या ११ पैकी जे. एम. बक्सी पोर्ट अँड लॉजिस्टिक्स प्रा. लि. मुंबई, जेएसडब्लू इन्फ्रास्ट्रक्चर मुंबई, क्यू टर्मिनल डब्ल्यूएलएल कतार, एपीएम टर्मिनल बी. व्ही. नेदरलॅण्ड, हिंदुस्थान पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड-मुंबई, टर्मिनल इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड - लक्झेमबोर्ग, इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल सर्व्हिसेस इनकॉर्पोरेशन मनिला-फिलिपाईन्स आदी सात कंपन्यांनी बोली सादर केली होती.
यात जे. एम. बक्सी पोर्ट अँड लॉजिस्टिक्स प्रा. लि. मुंबई या भारतीय कंपनीचे टेंडर अव्वल ठरले आहे. या कंपनीने एका २० फुटी कंटेनरच्या रॉयल्टीपोटी ४,२९३ रुपये दर देण्याची तयारी दर्शवली आहे. दुसऱ्या क्रमांकावर टर्मिनल इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड - लक्झेमबोर्ग ही बहुराष्ट्रीय कंपनी होती. पुढील ३० वर्षांसाठी जेएनपीए टर्मिनल चालविण्यासाठी देले जाणार आहे.