नवी दिल्ली : भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने (सीसीआय) रेल्वेच्या एका टेंडरमध्ये मोठा घोटाळा झाल्याचे उघड केले असून, या प्रकरणी सात कंपन्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. या सातही कंपन्यांवर दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीआयला रेल्वेच्या या टेंडरवर कंपन्यांनी लावलेल्या बोलीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रुपात किंमती ठरविण्यात आल्या, तसेच या किंमतींवर एकमेकांच्या सहमतीने बोली लावण्यात आली असे आरोप करण्यात आले आहेत. या सात कंपन्यांतील दहा जणांना या प्रकरणी दोषी पकडण्यात आले आहे. या प्रकरणी कंपन्यांच्या वार्षिक कमाईच्या आधारावर पाच टक्के दंड करण्यात आला आहे. साधारण ३० लाख रुपयांच्या घरात ही दंडाची रक्कम आहे.
रेल्वेला प्रोटेक्टिव ट्युब पुरविण्यासाठी हे टेंडर काढण्यात आले होते. मात्र, टेंडरमध्ये मोठ्या बोली लावून ते मिळविण्यात आल्याचा आरोप एका कंपनीने केल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले.