Mumbai Ahmedabad Bullet Train News मुंबई : मुंबई-अहमदाबाद पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पापाठोपाठ आता देशात आणखी एका मार्गावर बुलेट ट्रेन प्रकल्प उभारला जाणार आहे. भारतीय रेल्वे दिल्ली-हावडा दरम्यान बुलेट ट्रेन चालवण्याच्या तयारीत आहे. (Delhi Howrah Bullet Train Project)
दिल्ली-हावडा मार्गावर धावणारी बुलेट ट्रेन बक्सर, पाटणा आणि गया मार्गे जाईल. यासाठी तिन्ही जिल्ह्यात स्वतंत्र स्थानके बांधण्यात येणार आहेत. ताशी 350 किमी वेगाने ही बुलेट ट्रेन धावणार आहे. त्यामुळे पाटणा ते दिल्ली या प्रवासाला 17 तासांऐवजी तीन तास लागणार आहेत.
या मार्गावर बुलेट ट्रेन सुरू झाल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. पूर्वी 1-2 दिवसांचा प्रवास आता अवघ्या काही तासांवर येणार असल्यामुळे प्रवाशांसाठी पर्वणी ठरेल. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी बिहारमधील एलिव्हेटेड ट्रॅकचा मार्गदेखील निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. स्टेशन आणि एलिव्हेटेड ट्रॅक बांधण्यासाठी जमीन संपादनाचे कामही लवकरच सुरू होणार आहे.
याशिवाय नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडची टीम ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पाटण्याला पोहोचणार आहे. पाटणामधील फुलवारी किंवा बिहता येथे स्टेशन बांधण्यासाठी जागा निश्चित केली जाईल.
बुलेट ट्रेनला बिहारमधील बक्सर, पाटणा आणि गया जिल्ह्यात ट्रेन थांबेल. त्यासाठी तीन जिल्ह्यांत प्रत्येकी स्वतंत्र स्टेशन बांधले जाईल. बुलेट ट्रेन दिल्लीहून वाराणसी-पाटणामार्गे बक्सर आणि हावडा मार्गाने गयापर्यंत जाईल. बुलेट ट्रेनचा रेल्वे मार्ग हा उंच करण्यात येईल आणि त्याची उंची साधारण दोन मजली इमारतीइतकी असेल.
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचे कामही सध्या वेगाने सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत नवी मुंबईतील ३९४ मीटर लांबीच्या बोगद्याचे खोदकाम पूर्ण झाले आहे.
मुंबईतील घणसोली येथील हा मध्यवर्ती बोगदा पूर्ण झाल्यामुळे महाराष्ट्रातील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा दरम्यानच्या 21 किमी लांबीच्या बोगद्याच्या बांधकामाला गती मिळेल.