नवी दिल्ली (New Delhi) : केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील शेवटचा अर्थसंकल्प आज (ता. १) संसदेत सादर केला. सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला असून, जुलैमध्ये पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये पायाभूत सोयीसुविधांसाठी ११.११ लाख कोटींची तरतूद करण्याचे नियोजन आहे, असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. थोडक्यात पायाभूत सोईसुविधांच्या निर्मितीवर सरकारचा भर असेल असे अर्थसंकल्पी भाषणातून दिसून येते.
अर्थसंकल्पात तरुण, महिला, गरिबांनी आणि शेतकरी यांच्या हिताच्या अनेक घोषणा केल्या आहेत. कर सवलतींमध्ये कोणते बदल होतील याकडे सर्वांचे लक्ष होते, परंतु यावेळच्या अर्थसंकल्पातमध्ये प्राप्तिकराच्या मर्यादांमध्ये कोणताही बदल न केल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांना आयुष्यमान योजनेचा लाभ मिळणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले आहे.
गरिबांना घरे देण्यावर भर
सरकारने सौर ऊर्जा आणि गरिबांना घर देण्याच्या धोरणावर विशेष भर दिला आहे. कोविडच्या संकटाच्या काळातही, केंद्र सरकारने गरीब लोकांना घरे प्रदान केली आहेत. गरिबांना 3 कोटी घरांचे वाटप करण्याच्या उद्दीष्टाच्या पूर्तीकडे सरकारची वाटचाल सुरू आहे. आगामी पाच वर्षांत आणखी 2 कोटी घरे बनविण्याचा सरकारचा मानस आहे. या घरांपैकी 1 कोटी घरांवर सौर पॅनेल लावण्यात येतील. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी पंतप्रधान मोदींनी याबाबतची घोषणा केल्याची आठव सीतारामन यांनी आपल्या भाषणात करून दिली.
दहा वर्षांत ३९० विद्यापीठांची स्थापना
गेल्या दहा वर्षांत, केंद्र सरकारने 3 हजार नवीन आयटीआय, 7 आयआयटी, 16 आयआयआयटी, 7 आयआयएम, 15 एम्स आणि 390 विद्यापीठांची स्थापना केली आहे.