कामठी (Kamthi) : भावाला टँकरने पाणी पुरवण्याचे (Water Supply) कंत्राट दिल्याचे उघडकीस आल्यानंतर नागपूर जिल्ह्यातील (Nagpur District) कामठी तालुक्यातील म्हसाळा गावाचे सरपंच शरद सूर्यभान माकडे यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. अवघ्या पाच लाखाच्या कंत्राटामुळे शरद माकडे यांना आपले सरपंचपद गमाववे लागले आहे.
सरपंच शरद माकडे यांनी पदाचा दुरुपयोग करत स्वतःच्याच भावाला पाणी पुरवठ्याचे कंत्राट दिले. यात त्यांचाही प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे आढळून आले. त्यामुळे अपर जिल्हाधिकारी शिरीष पांडे यांनी माकडे यांचे सरपंचपद रद्द करण्यात आल्याचे घोषित केले आहे. माकडे यांनी खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी ५ लाख १० हजार ८४० रुपये अदा केले होते. शासकीय अनुदान जमा होण्यापूर्वीच पाणीटंचाईच्या नावावर ग्राम पंचायतीच्या स्वनिधीतून त्यांनी हा खर्च केला होता.
माकडे यांनी पाणी टंचाई संदर्भात खाजगी पाण्याचे टँकर लावण्याकरिता दरपत्रक (ई निविदा) प्रणालीचा अवलंबसुद्धा केला नव्हता. त्यांचे बंधू भय्यालाल माकडे यांच्या खाजगी टँकरला पाणी पुरवठा करण्याची मान्यता दिली होती. भय्यालाल माकडे हे सरपंच माकडे यांचे ज्येष्ठ बंधू आहेत. या संदर्भात स्थानिक नागरिकांनी व इतर सदस्यांनी तक्रारी केल्या होत्या. या प्रकरणाची चौकशीसुद्धा करण्यात आली होती. अप्पर जिल्हाधिकारी नागपूर यांच्या न्यायालयात या प्रकरणी सुनावणी झाली. या प्रकरणात अर्जदार नीलेश डफरे यांच्यावतीने ॲड. भोजराज धंदाळे व प्रभारी सरपंच शरद माकडे यांच्यावतीने ॲड. श्रीरंग भोंगाडे यांनी युक्तिवाद केला.
शरद माकडे होते प्रभारी सरपंच
म्हसाळा ग्रामपंचयातीच्या निवडणुकीत अनिता आहाके या निवडून आल्या होत्या. शरद माकडे उपसरपंच होते. मात्र आहाके यांनी पाणंद रस्त्यावर अतिक्रमण करून घर बांधले होते. त्यामुळे त्यांना अपात्र घोषित करण्यात आले होते. या कारणामुळे उपसरंपच माकडे यांची प्रभारी सरपंच म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. प्रभारी सरपंचपद मिळाल्यानंतर माकडे यांनीही कुठलाही मागचापुढचा विचार न करता सख्या भावालाचा पाणी पुरवठ्याचे कंत्राट देऊन स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला.