मुंबई (Mumbai) : दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथील बाणगंगा तलाव आणि परिसराचा जीर्णोद्धार मुंबई महानगरपालिकेमार्फत (BMC) केला जाणार आहे. हे काम तीन टप्प्यात करण्यात येणार असून यासाठी मुंबई महापालिकेने टेंडर (Tender) प्रसिद्ध केले आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या निर्देशानुसार मुंबई महापालिका प्रशासनाने बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प हाती घेतला आहे. बाणगंगा परिसराचे सुशोभीकरण करण्याचे कामही महापालिकेच्या विभाग कार्यालयामार्फत सुरू आहे. तलावाच्या सुशोभीकरणाचे काम महापालिकेने गेल्या वर्षभरापासून हाती घेतले आहे. बाणगंगा परिसराला बकाल स्वरूप आणणारी अनधिकृत बांधकामे देखील हटवण्यात आली होती.
परिसरातील अतिक्रमणे हटवून त्याचे वारसापण जतन करण्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या कामाअंतर्गत ढिगाऱ्याखाली गाडलेल्या रामकुंडाचाही शोध लावण्यात यश आला आहे. त्यात आता पुढे रामकुंडाचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. तसेच सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्याकरिता महापालिकेने टेंडर प्रसिद्ध केले आहे.
ही कामे तीन टप्प्यात करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात तलावाच्या दगडी पायऱ्यांची सुधारणा करणे, विद्युत रोषणाई करणे, तलावाच्या सभोवतालचा मार्ग भक्ती मार्ग म्हणून विकसित करण्यात येणार आहे. तर, दुसऱ्या टप्प्यात तलावातून दिसणाऱ्या इमारतीची एकसमान पद्धतीने रंगरंगोटी करणे, रामकुंड पुनरुज्जीवित करणे ही कामे आहेत. तिसऱ्या टप्प्यामध्ये बाणगंगा ते अरबी समुद्र या दरम्यान विस्तृत मार्गिका बनवणे, झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करणे ही कामे हाती घेतली जाणार आहेत.
ग्रॅंटरोड पश्चिम येथे मलबार हिल परिसरात वाळकेश्वरच्या बाणगंगा तलाव ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. मलबार हिल टेकडीच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेले हे गोड्या पाण्याचे कुंड आहे. आजूबाजूने समुद्राने वेढलेले असताना त्यात मध्यभागी हे गोड्या पाण्याचे कुंड असल्यामुळे तलावाविषयी विशेष आकर्षण आहे. तलावाजवळ व्यंकटेश बालाजी मंदिर, सिद्धेश्वर शंकर मंदिर, बजरंग आखाडा व वाळकेश्वर मंदिर आदी प्रसिद्ध ठिकाणे आहेत.
बाणगंगा तलावाला धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असल्यामुळे या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या तलावाचे प्राचीन कालीन महत्त्व लक्षात घेऊन विविध भाविक आणि देशीविदेशी पर्यटकही याठिकाणी येतात. त्यामुळे वाळकेश्वर येथील ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसराला महाराष्ट्र सरकारने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे.