मुंबई (Mumbai) : शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक पवित्र्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनाकडून शहरातील सर्व वॉर्डमध्ये समान निधी वाटप केले जाणार आहे. लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार आणि विकासकामांच्या प्रस्तावानुसार हा निधी देण्यात येईल. यामुळे दीडशे प्रस्तावांमधील पाचशे कोटींच्या विकासकामांचा मार्ग मोकळा होणार आहे.
मुंबई महानगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपल्यानंतर महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती आला आहे. दरम्यान राज्यात सत्ताबदल होऊन सत्तेत आलेल्या शिंदे सरकारने महापालिका प्रशासनावर दबाव आणून शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी असलेल्या विभागांना निधी न देण्याचे धोरण अवलंबले होते. याच वेळी शिंदे गट आणि भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या वॉर्डमध्ये मात्र कोट्यवधींची खैरात सुरू होती.
मुंबईतील किकासकामांसाठी निधी हवा असल्यास पालकमंत्र्यांच्या शिफारशीने देण्याचा निर्णयही महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे शहरातील विकासकामांनाही ब्रेक लागला होता.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी महापालिकेवर धडक देत आयुक्तांना धारेवर धरले होते. महापालिकेच्या दुटप्पी धोरणावर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सपानेही आक्षेप घेत निषेध नोंदवला होता. शिवाय न्यायालयात जाण्याचा इशारा देण्यात येत होता.
या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून आता समान निधीचे वाटप केले जाणार आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडून कार्यवाही सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विकासकामांसाठी निधी न दिल्यास सर्व वॉर्डमध्ये आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शिवसेनेने दिला होता.