नागपूर : सुमारे सात वर्षांपासून अपूर्ण असलेल्या नागपूर शहरातील पारडी येथील उड्डाणपुलाचा गर्डर कोसळल्याने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. विशेष म्हणजे ‘जीडीसीएल'नावाच्या कंपनीला या पुलाचे कंत्राट दिले आहे. भाजपचा एक माजी खासदार आणि फायनान्सर या कंपनीचे संचालक असल्याने बोलताही येत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था भाजपच्या कार्यकर्त्यांची झाली आहे.
अवाढव्य आणि अशक्य ते शक्य करून दाखवणारे म्हणून नितीन गडकरी यांची ख्याती आहे. केवळ नागपूरच नव्हे तर देशभरात त्यांनी रस्ते आणि उड्डाणपुलांचे जाळे विणले आहेत. विरोधकही गडकरी यांच्या कामांची प्रशंसा करतात. कोट्यवधीचे कामे अतिशय कमी वेळेत करून दाखवण्याची किमयासुद्धा त्यांनी करून दाखवली आहे. मात्र गडकरी यांना त्यांच्याच मतदारसंघात आणि घराजवळ असलेल्या पारडी उड्डाणपूल मात्र सहा वर्षांपासून पूर्ण करता आला नाही. अवघ्या पाचशे मीटरचा हा उड्डाणपूल आहे. ऑगस्ट २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुलाचे भूमिपूजन केले होते. मात्र भूमिपूजनापासूनच पुलाला ग्रहण लागले.
यापूर्वीच कंत्राटदाराला दोनदा मुदतवाढ दिली. त्यानुसार २०१९मध्ये या पुलाचे बांधकाम पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र कंत्राटदार वारंवार मुदतवाढ देऊनही काम पूर्ण करीत नाही. त्यामुळे गडकरीसुद्धा वैतागले आहेत. आता गर्डर पडल्याने गडकरी, कंत्राटदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी यांच्या विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. सुदैवाने गर्डर रात्री कोसळल्याने कुठलीही प्राणहानी झाली नाही. मात्र या पुलाच्या कामाताली भ्रष्टाचार, लेटलतिफी उजागर झाली आहे.
चौकशीचा नुसताच देखावा ?
नितीन गडकरी यांनी तडकाफडकी पुलाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. मात्र यातून काही साध्य होणार नाही. चौकशी करणारे अधिकारी राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाचे अधिकारी आहे. कंत्राटदार भाजपचाच आहे. त्यामुळे अधिकारी गडकरी आणि कंत्राटदाराच्या विरोधात जाऊन अहवाल सादर करण्याची सूतराम शक्यता नाही. ज्या ठिकाणी पारडी उड्डाण पुलाचे काम सुरू आहे तो चौकशी अतिशय वर्दळीचा आहे. पूर्व नागपूरमधून बाहेर पडण्यासाठी तो एकमेव प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे सातत्याने या मार्गावर जडवाहनांची वर्दळ असते. विशेष म्हणजे उड्डाणपुल, सोबतच खालच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि वर मेट्रो रेल्वेचा पूल असे तीन कामे सुमारे पाच वर्षांपासून एकाचवेळ येथे सुरू आहे. त्यामुळे या परिसरातील जनता आणि जाणारे येणारे चांगलेच वैतागले आहेत. प्रत्येक जण काम केव्हा पूर्ण अशी विचरणा करीत आहेत. याच मार्गावरून जाताना वर्षभरापूर्वी स्वतः नितीन गडकरी वाहतूक कोंडीत अडकले होते. त्यामुळे गडकरी यांना गाडीच्या बाहेर पडून वाहतूक सुरळीत करावी लागली होती. गडकरी यांना रस्त्यावर बघून परिसरातील नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची गर्दी त्यांना भेटण्यासाठी जमली होती. त्यामुळे कोंडी सुटण्याऐवजी आणखी वाढली होती. त्यावेळीसुद्धा गडकरी यांनी संबंधित कंत्राटदारालाच खडसावले होते.
भाजपच्या लोकप्रतनिधींची गोची
पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात भाजपचा आमदार आहे. ज्या भागात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे तेथे भाजपचा नगरसेवक आहे. नागरिकांच्या तक्रारीला कंटाळून नगरसेवकाने एकदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्याला कोंडून ठेवले होते. त्याच्यावर गुन्हासुद्धा दाखल केला होता. अधिकाऱ्यांना कोंडल्याने गडकरी यांनी संबंधित आमदार आणि नगरसेवकाला चांगलेच फटकारले होते. त्यामुळे आता पुलाचा गर्डर कोसळला तरी भाजपच्या नेत्यांना बोलण्याची सोय राहिली नाही.