नागपूर (Nagpur) : राज्य सरकारने ७५ हजार नोकऱ्या देण्याची घोषणा केली असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातील नागपूर महापालिकेने १८९ संगणक चालकांच्या नोकऱ्या हिरावून घेण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता भाजपचाच एक नेता नव्याने कंत्राट काढण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकत असल्याची जोरदार चर्चा आहे.
महापालिकेत कंत्राटी पद्धतीवर संगणक चालक म्हणून १८९ संगणक चालक कार्यरत आहेत. अनेकाजण सुमारे १५ ते २० वर्षांपासून कार्यरत आहेत. त्या सर्वांची सेवा समाप्त केली जाणार आहे. त्यासाठी नवे कंत्राट काढण्यात येणार आहे. नव्याने भरती केल्या जाणाऱ्या संगण चालकांसाठी वयोमर्यादा ३० वर्षे ठेवण्यात आली आहे. त्यांना किमान वेतन कायद्यापेक्षा कमी १५ हजार रुपये वेतन दिले जाणार आहे. सध्याच्या संगणक चालकांना २० हजार ६६६ रुपये वेतन दिले जाते. याशिवाय भविष्य निर्वाह निधी कापल्या जातो तसेच ईएसआयसीची सुविधाही कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना दिली जाते. ही सेवाही नव्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणार नाही.
महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यास विरोध केला होता. विद्यमान मुख्यमंत्री तसेच तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही हा प्रस्ताव रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच एक अपिलही राज्य सरकारकडे दाखल केले होते. त्याचा निर्णय अद्याप आला नसल्याने महापालिकेने पुन्हा नवे कंत्राट काढण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.