पुणे (Pune) : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Pune National Highway) देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतच्या (Dehu Road To Chandni Chowk) रस्त्याच्या कामाचा नवीन डीपीआरला (DPR) मंजुरी दिली असून, या कामासाठी लवकरच टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, प्रत्यक्ष कामालाही लवकरच सुरू होईल. त्यामुळे देहूरोड ते चांदणी चौकापर्यंतच्या मार्गावर ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी फूटण्यासाठी मोठ्या प्रमाणात हातभार लागणार आहे.
देहूरोड, रावेत, पुनावळे, ताथवडे आणि वाकड येथील अंडरपास व ओव्हर ब्रीजची उंची आणि रुंदी कमी आहे. त्यामुळे तिथे वाहतूक कोंडी होते. वाहतुकीची ही समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा सुधारीत डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) तयार करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. या कामाला गडकरी यांनी नुकताच हिरवा कंदील दाखविला आहे.
देहूरोड ते चांदणी चौक हे काम पूर्ण करण्याची आणि त्याच्या देखभालीची जबाबदारी रिलायन्सला दिली होती. परंतु, या मार्गावरील काम ठेकेदाराने पूर्ण केले नाही. अनेक ठिकाणी अर्धवट काम आहे. देहूरोड आणि वाकड पर्यंतचे क्षेत्र पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येत आहे. वाकड ते चांदणी चौकापर्यंतचे क्षेत्र पुणे महापालिका हद्दीत आहे. या राष्ट्रीय महामार्गावर देहूरोड ते चांदणी चौक (पुणे) दरम्यान १२ अंडरपास आणि उड्डाणपूल आहेत.
देहूरोड-चांदणी चौक रस्त्याच्या कामात मावळ लोकसभा मतदारसंघातील देहूरोड, रावेत, पुनावळे, ताथवडे आणि वाकड येथील अंडरपास व उड्डाण पुलाची उंची आणि रुंदी कमी आहे. त्यामुळे तिथे वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या रस्ताचा सुधारीत डीपीआर बनविण्याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. पाठपुराव्याला यश आले असून सुधारित डीपीआर तयार झाला आहे. लवकरच टेंडर प्रसिद्ध केली जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले. त्यामुळे टेंडर प्रसिद्ध करून काम वेगात पूर्ण करण्यावर भर असणार आहे. काम पूर्ण झाल्यास वाकड, ताथवडे येथील वाहतूक कोंडी कमी होईल.
- श्रीरंग बारणे, खासदार, मावळ