मुंबई (Mumbai) : लार्सन अँड टुब्रो कंपनीने (Larsen & Toubro Ltd. India) दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगरे आणि ठाण्यात मिळून ८००० कोटी आणि ४.४ दशलक्ष चौरस फूट विकासाची क्षमता असलेल्या प्रकल्पांचा सह-विकास करण्याची घोषणा केली आहे. एल अँड टी रिअॅलिटी (L&T Realty Limited), या लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या स्थावर मालमत्ता विकास विभागाने मुंबई बाजारपेठेत विस्तार करण्याची ही योजना जाहीर केली आहे.
दक्षिण मुंबई प्रकल्प पाच एकर जागेवर विकसित केला जाणार असून, मुंबईच्या इतर भागांशी चांगली कनेक्टिव्हिटी असलेल्या या परिसरातून समुद्रकिनाऱ्याचे नयनरम्य दृश्य पाहता येईल. या निवासी संकुलात ५० मजली ट्विन टॉवर्स आणि लक्झरी सुविधा व रिटेलचा समावेश असेल.
पश्चिम उपनगरातील प्रकल्प अंधेरीतील मध्यवर्ती ठिकाणी वसवला जाणार आहे. हा एल अँड टी रिअॅलिटीचा पश्चिम उपनगरातील पहिला प्रकल्प आहे आणि कंपनी आधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्ससह २० टॉवर्सचा समावेश असलेले अत्याधुनिक गेटेड निवासी संकुल उभारणार आहे.
ठाणे प्रकल्प शहरात मोक्याच्या ठिकाणी ६ एकर जागेवर विकसित केला जाणार आहे. भोवताली असलेल्या दर्जेदार पायाभूत सुविधा आणि अंतर्गत सुविधांसह हे हाय-राइज निवासी टॉवर्स ठाण्याच्या स्कायलाइनमध्ये ठळकपणे उठून दिसतील.
एल अँड टी रिअॅलिटीच्या पोर्टफोलिओमध्ये निवासी, व्यावसायिक आणि रिटेल स्तरावर विकसित केलेल्या ७० दशलक्ष चौर फूट जागेचा समावेश असून, कंपनी सध्या मुंबई, नवी मुंबई, बेंगळूर, चेन्नई आणि काही प्रमाणात हैदराबाद व एनसीआरमध्ये अस्तित्वात आहे. हा कंपनीच्या पुढील पाच वर्षांत दर वर्षी ५ दशलक्ष चौरस फूट जागेचा विस्तार करत प्रमुख महानगरांत विकास करण्याच्या मोठ्या धोरणाचा एक भाग आहे.
यासंदर्भात एल अँड टी रिअॅलिटीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत जोशी म्हणाले, 'कंपनीचा विस्तार सुरू ठेवण्यासाठी आणि नव्या बाजारपेठांचा शोध घेत राहण्यासाठी आम्ही बांधील आहोत. एल अँड टी रिअॅलिटीची प्रमुख वैशिष्ट्ये आणि दर्जाचे जागतिक मापदंड लक्षात घेत कंपनीतर्फे या प्रकल्पांचे काम केले जाणार असून हे काम आमच्या जलद अंमलबजावणी क्षमतेवर असलेल्या विश्वासाची पावती आहे.